सेरेना, जोकोविच, मरे, अजारेंका सुसाट
By admin | Updated: September 2, 2014 19:35 IST
यूएस ओपन टेनिस : मिलोस राओनिक, विल्फ्रेट त्सोंगा आऊट
सेरेना, जोकोविच, मरे, अजारेंका सुसाट
यूएस ओपन टेनिस : मिलोस राओनिक, विल्फ्रेट त्सोंगा आऊट न्यूयॉर्क : सर्बियाचा नोव्हाक जोकोविच, ब्रिटनचा अँडी मरे, अमेरिकेची सेरेना विल्यम्स, बेलारूसची व्हिक्टोरिया अजारेंका यांनी यूएस ओपन टेनिस स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़ मात्र, पुरुष एकेरीत फ्रान्सचा विल्फ्रेड त्सोंगा आणि कॅनडाच्या मिलोस राओनिक यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता धरावा लागला़ जोकोविचने आपला विजयी फॉर्म कायम रखाताना पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या फिलिप कोलश्रेबर याचा सरळ सेटमध्ये ६-१, ७-५, ६-४ असा सहज पराभव करीत आगेकूच केली़ पुरुष गटातील अन्य लढतीत ब्रिटनच्या अँडी मरे याने फ्रान्सच्या त्सोंगावर ७-५, ७-५, ६-४ अशी मात करीत अंतिम आठ खेळाडूंत जागा निश्चित केली़ २०१२ मध्ये विम्बल्डन चॅम्पियन राहिलेल्या मरे याने वर्षांत पहिल्यांदाच अव्वल १० खेळाडूंत समावेश असलेल्या टेनिसपटूविरुद्ध विजय मिळविला आहे़ दरम्यान, स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यापूर्वी अंतिम आठ खेळाडूंत मरेला नोव्हाक जोकोविचचा सामना करावा लागणार आहे़ महिला गटातील एकेरी सामन्यात अमेरिकेच्या सेरेना हिने लौकिकास साजेसा खेळ करताना एस्तोनियाच्या काईना कानेपीला ६-२, ६-३ अशी सहज धूळ चारताना उपांत्यपूर्व फेरी गाठली़ १६ वे मानांकन प्राप्त बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंका हिने सर्बियाच्या एलेक्सांद्रा क्रुनिकवर ४-६, ६-४, ६-४ ने सरशी साधताना थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़ स्वीत्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकानेही अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे़ त्याने स्पेनच्या टॉमी रॉबरेडोचा ७-५, ४-६, ७-६, ६-२ असा पराभव केला़ जपानच्या केई निशिकोरी याने कॅनडाच्या मिलोस राओनिक वर ४-६, ७-६, ६-७, ७-५, ६-४ असा विजय मिळविला़ महिला गटातील चौथ्या फेरीत कॅनडाची इयुजिनी बुकार्ड हिला रशियाच्या एकातेरिना मकारोव्हाकडून ७-६, ६-४ अशी मात खावी लागली़ इटलीच्या फ्लाविया पेनेटा हिने ऑस्ट्रेलियाच्या कासी डैलेकुआचा ७-५, ६-२ असा पराभव करीत अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळविले़