मुंबई : सारा जामसुतरक या मुंबई शहरच्या टेबल टेनिसपटूने शानदार कामगिरी करताना महाराष्ट्र राज्य रोख बक्षीस टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या १५ वर्षांखालील गटाचे जेतेपद पटकावले. तिने चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या साईशा मधुर हिचा ३-१ असा पराभव केला.
पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त कमबॅक
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या (एमएसटीटीए) मान्यतेने खार जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेत साराने चार गेममध्ये बाजी मारताना साईशाचे कडवे आव्हान ३-११, ११-९, ११-५, ११-५ असे परतवले. प्रभादेवी येथील कामगार क्रीडा भवन टेबल टेनिस अकादमीमध्ये टेबल टेनिसचे धडे गिरवणाऱ्या साराने पहिला गेम गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत सलग तीन गेम जिंकून जेतेपद पटकाविले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ठाण्याच्या ज्ञानश्री तर्डेला पराभूत करत गाठली होती अंतिम फेरी
याआधी झालेल्या, उपांत्य सामन्यात साराने ठाण्याच्याच ज्ञानश्री तर्डे हिचा ११-९, ११-६, ७-११, १०-१२, १२-१० असा रोमांचक पराभव केला होता. दुसरीकडे, साईशाने दी सबर्बन टेबल टेनिस संघटनेच्या (टीएसटीटीए) सारा रमैयाला ११-८, ११-८, ११-२ असे सलग तीन गेममध्ये नमवून विजयी आगेकूच केली होती.