नवी दिल्ली : करिअरमध्ये सुवर्णकाळ अनुभवणारी, दुहेरीच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिस स्टार सानिया मिर्झा हिची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्कारासाठीची दावेदारी इतरांच्या तुलनेत वरचढ ठरत आहे.२९ आॅगस्ट रोजी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी अर्थात राष्ट्रीय क्रीडादिनी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कराला एक महिन्याचा कालावधी आहे. राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी चढाओढ शिगेला पोहोचली आहे. गतवर्षी खेलरत्न कुणालाही देण्यात आला नव्हता. २०१४ ला माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने एकालाही या पुरस्करासाठी पात्र समजले नव्हते. त्यावेळी या पुरस्काराच्या दावेदारीत थाळीफेकपटू विकास गौडा, कृष्णा पुनिया, टेनिस स्टार सोमदेव देवबर्मन, महान गोल्फर जीव मिल्खासिंग, दोन वेळा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि देवेंद्र झांझरिया यांचा समावेश होता. १९९१ पासून सुरू झालेल्या खेलरत्न पुरस्कारांच्या इतिहासात कुणाही खेळाडूला पात्र ठरविण्यात न आल्याची ही तिसरी वेळ होती. त्यावेळी जीव मिल्खाच्या नावावर सर्वाधिक चर्चा झाली पण समितीचे एकमत नव्हते, अशी माहिती आहे.यंदा सानियाची दावेदारी भक्कम आहे. सानियाने मात्र या पुरस्कारासाठी अर्ज दिलेला नाही. क्रीडा मंत्रालय या पुरस्कारासाठी तिच्या नावाची शिफारस करू शकते. सानियाने यंदा शानदार कामगिरी करीत देशाची शान उंचावली. सानियाने अर्ज भरला नसला तरी क्रीडा मंत्रालय स्वत:हून योग्य खेळाडू म्हणून सानियाची या पुरस्कारासाठी फिारस करू शकते. क्रीडामंत्रालय तसा विचार देखील करीत आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दरवर्षी एका एका खेळाडूला दिला जातो. २००८ साली हा नियम शिथिल करीत बॉक्सर मेरिकोम, बॉक्सर विजेंदर आणि मल्ल सुशीलकुमार यांना तसेच २०१२ साली मल्ल योगेश्वर दत्त व नेमबाज विजयकुमार यांना संयुक्तपणे या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर सरकारने नियमात फेरबदल करीत दरवर्षी हा पुरस्कार केवळ एका खेळाडूला देण्याचे जाहीर केले. आॅलिम्पिक वर्षांत नियमात शिथिलता राहील, असेही सांगितले.सानियाची यंदाची कामगिरी पाहता तिला हा पुरस्कार मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे. तथापि सरदारसिंग आणि विकास गौडा यांच्याकडून कडवे आव्हान मिळू शकते. सरदारच्या नेतृत्वात भारताने १६ वर्षानंतर आशियाडचे सुवर्णपदक जिंकले होते शिवाय रियो आॅलिम्पिकसाठीही पात्रता मिळविली. अमेरिकेत वास्तव्यास असलेला विकास गौडा याने गतवर्षीच्या ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत थाळीफेकीचे सुवर्ण जिंकले. एक महिन्यानंतर इंचियोन आशियाडमध्ये त्याने रौप्यपदकाची देखील कमाई केली होती.(वृत्तसंस्था)यांचे आले अर्ज...यंदा नऊ खेळाडूंचे खेलरत्नसाठी अर्ज आले. त्यात दीपिका पल्लिकल स्क्वॅश, सीमा अंतिम थाळीफेक, विकास गौडा थाळीफेक, सरदारसिंग हॉकी, टिंटू लुका अॅथ्लेटिक्स, अभिषेक वर्मा तिरंदाजी, गिरिषा एच. एन. पॅरालिम्पिक हायजम्पर, पी. व्ही. सिंधू बॅडमिंटन तसेच जीव मिल्खासिंग गोल्फ यांचा समावेश आहे.सानियाची कामगिरी...- २८ वर्षांची सानिया यंदा एप्रिल महिन्यात दुहेरीत नंबर वन बनली. - जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस हिच्यासोबत तिची जोडी जगात नंबर वन आहे. या महिन्यात तिने विम्बल्डन महिला दुहेरीचेही विजेतेपद पटकाविले. - सानियाला २००४ मध्ये अर्जुन तसेच २००६ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. - गतवर्षी इंचियोन आशियाडमध्ये साकेत मिनेनीसोबत मिश्र दुहेरीचे सुवर्ण आणि प्रार्थना ठोंबरेसोबत महिला दुहेरीचे कांस्य पदक तसेच अमेरिकन ओपनमध्ये ब्राझीलचा बु्रनो सोरेस याच्यासोबत सानियाने मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकविले होते.
सानियाची दावेदारी ‘भारी’
By admin | Updated: August 1, 2015 00:40 IST