सानिया, पेस
By admin | Updated: September 2, 2014 19:36 IST
सानिया मिर्झा उपांत्य फेरीत
सानिया, पेस
सानिया मिर्झा उपांत्य फेरीत यूएस ओपन टेनिस : लिएंडर पेस पराभूत न्यूयॉर्क : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने मिश्र दुहेरीत ब्राझीलच्या ब्रुनो सोरेससह खेळताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे़ सानियाने स्पर्धेच्या दुहेरीतही उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळविली आहे़ मात्र, भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसला मिश्र दुहेरी आणि दुहेरी लढतीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला़ अव्वल मानांकन प्राप्त सानियाने मिश्र दुहेरीत सोरेससह भारताच्या रोहन बोपन्ना आणि स्लोवेनियाच्या कॅटरिना सेब्रोत्निक या जोडीवर ७-५, २-६, १०-५ अशी सरशी साधून थाटात स्पर्धेची सेमीफायनल गाठली़ उपांत्य फेरीच्या लढतीत सानिया आणि सोरेस या जोडीला आता चिनी तैपेईच्या युंग जॉन चान आणि ब्रिटनच्या रॉस हचिंस यांचा सामना करावा लागणार आहे़सानियाने महिला दुहेरीच्या तिसर्या फेरीत झिम्बाब्बेच्या कारा ब्लॅकसह झेक प्रजासत्ताकच्या क्लारा कुकालोव्हा आणि सर्बियाची येलेना यांकोविच या जोडीचे आव्हान ६-३, ६-२ असे मोडून काढून उपांत्यपूर्व फेरी गाठली़ सानिया आणि ब्लॅक यांना पुढच्या फेरीत आता चीनची यि फान शू आणि कजाकिस्तानची जरीना दियास या जोडीशी झंुज द्यावी लागेल़ भारताचा अनुभवी खेळाडू लिएंडर पेस आणि त्याच्या साथीदार रादेक स्टेपानेक यांना मात्र पुरुष दुहेरीत तिसर्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला़ या जोडीला स्पेनचा मार्शल ग्रानोलर्स आणि मार्क लोपेज या जोडीकडून २-६, ६-४, १-६ अशी मात खावी लागली़ पेसला मिश्र दुहेरीतही पराभवाचे तोंड पाहावे लागले़ पेस आणि झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅक या जोडीवर अमेरिकेची एबिगेल स्पीयर्स आणि मेक्सिकोच्या सँटियागो गोंजालेज यांनी ४-६, ६-४, ८-१० ने सरशी साधत पुढच्या फेरीत प्रवेश केला़ (वृत्तसंस्था)