सिंगापूर : नुकताच झालेल्या मलेशिया ओपनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या सायना नेहवालने आता सिंगापूर सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे, ६ वर्षांपूर्वी या स्पर्धेत बाजी मारून खळबळ माजवलेल्या सायनाने याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये केवळ ३ वेळा सायनाने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मात्र, यामध्ये एकदाही ती उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जाण्यात यशस्वी ठरली नाही. बुधवारी होणाऱ्या सलामीच्या सामन्यात सायना अमेरिकेच्या बीवेन चँगविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार असून, अव्वल ८ खेळाडूंमध्ये जागा निश्चित करण्याचे तिचे प्रमुख लक्ष्य आहे.जागतिक क्रमवारीत ८व्या स्थानी असलेल्या सायनाने यंदा स्विस ग्रांप्री, इंडिया ओपन सुपर सिरीज आणि मलेशिया सुपर सिरीज या ३ स्पर्धांत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत सर्वप्रथम पात्रता फेरीचे सामने रंगतील. त्यानंतर मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार असून, त्यामध्ये सायनाशिवाय पी. व्ही. सिंधू, एच. एस. प्रणय, अजय जयराम आणि किदांबी श्रीकांत यांच्यावरही भारताच्या आशा आहेत. सिंधूला सलामीला थायलंडच्या बुसानन ओंगबुमरंगफानविरुद्ध लढावे लागेल. तर, पुरुष एकेरीमध्ये स्विस ओपनविजेत्या प्रणयचे प्रमुख लक्ष्य आॅलिम्पिक तिकीट मिळविणे असेल. त्याच्यापुढे पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला चीनच्या चेन लोंगचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)
सायनाचे लक्ष सिंगापूर ओपन स्पर्धेवर
By admin | Updated: April 12, 2016 03:35 IST