हाँगकाँग : चायना ओपनचे अजिंक्यपद मिळवून नवा इतिहास रचणारे भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि के़ श्रीकांत उद्या, मंगळवारपासून सुरू होणाऱ्या हाँगकाँग ओपन सुपर सीरिजमध्येही अजिंक्यपद मिळविण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. या स्पर्धेत महिला दुहेरीत ज्वाला - अश्विनी जोडीच्या कामगिरीवरही सर्वांची नजर असेल़ सायना आणि श्रीकांत यांनी आपापल्या गटात काल, रविवारी चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते़ त्यामुळे दोन्ही खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे़ याच बळावर हे खेळाडू हाँगकाँग ओपनमधील एकेरी गटात आपले वर्चस्व राखतील अशी आशा आहे़अन्य भारतीय खेळाडूंत राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन पी़ कश्यपचा पहिल्या फेरीत थायलंडच्या तानोगसक सिसोमबूनसकशी सामना होणार आहे़ हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत ५ वेळा एकमेकांशी झुंजले आहेत़ यापैकी कश्यपला दोन वेळा विजय मिळविता आला आहे़ अन्य महिला एकेरी सामन्यात पी़ व्ही़ सिंधूच्या कामगिरीवरही सर्वांची नजर असणार आहे़ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत तिच्यासमोर थायलंडच्या बुसानन ओंगबुमरंगपेनचे आव्हान असणार आहे़ सिंधूने बुसाननला यापूर्वी तीन वेळा धूळ चारली आहे़ त्यामुळे या लढतीत भारतीय खेळाडूंची बाजू वरचढ मानली जात आहे़ महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा, यिन लू लिम आणि मेंग यीन ली या मलेशियाच्या खेळाडूंशी झुंजणार आहेत. (वृत्तसंस्था)
सायना, श्रीकांतकडून जेतेपदाची अपेक्षा
By admin | Updated: November 18, 2014 00:53 IST