कोलून : विश्व क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेली भारतीय स्टार सायना नेहवाल आज, शुक्रवारी हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत ३९ मिनिटांत खळबळजनकरीत्या पराभूत झाली. चायनीज तायपेईची सहाव्या स्थानावरील ताई ज्यू यिंग हिने सायनाचे आव्हान २१-१५, २१-१९ ने मोडीत काढले.विश्व चॅम्पियनशिपचे दोनदा कांस्य जिंकणारी पी. व्ही. सिंधू दुसऱ्या फेरीत बाहेर पडल्यानंतर सायनाकडून जेतेपदाच्या आशा होत्या, पण तीदेखील पराभूत झाल्याने अपेक्षांवर पाणी फेरले गेले. सायनाच्या पराभवासोबतच महिला एकेरीतील भारतीय आव्हान संपुष्टात आले.सायनाचा हा पराभव अनेकांना धक्का देणारा ठरला. तिसऱ्या स्थानावर असलेल्या या खेळाडूला सहाव्या स्थानावरील खेळाडूने ३९ मिनिटांत धूळ चारणे हे चाहत्यांना न पटण्यासारखे आहे. सामन्यात सायना पारंपरिक आक्रमक खेळ दाखवू शकली नाही. ताई ज्यू हिने ४२ तसेच सायनाने ३४ गुणांची कमाई केली. पहिल्या गेममध्ये सायनाने २-० अशा आघाडीद्वारे सुरुवात केली खरी, पण प्रतिस्पर्धी खेळाडूने सलग पाच गुणांची कमाई करीत सायनाला नमवू शकतो, अशी झलक दाखविली होती. एकवेळ सायना ८-१४ ने माघारली होती. ज्यू ने त्यानंतरही वर्चस्व राखून पहिला गेम २१-१५ ने जिंकला.दुसरा गेममध्ये सायनाने संघर्ष करीत गुणांची कमाई केली, पण तायपेईच्या खेळाडूचे आव्हान कायम राहिल्याने सामन्यात अंतर निर्माण झाले. तिने सायनाला ९-११ असे मागे टाकले, पण सायनाने सलग चार गुणांची कमाई करीत सामन्यात १३-११ अशी चुरस निर्माण केली, पण तायपेईच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने आधी गेम १७-१५ आणि नंतर २१-१९ असा स्वत:कडे खेळ झुकवित सामनाही खिशात घातला. (वृत्तसंस्था)
सायना नेहवाल पराभूत
By admin | Updated: November 22, 2014 02:01 IST