ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - 'क्रिकेटच्या जगतातील देव' अशी ओळख असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित चित्रपट येत असून आज ' सचिन - ए बिलियन ड्रीम्स' या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. खुद्द सचिननेच ट्विटरवरून ही माहिती व टीझरची लिंकही शेअर केली आहे. ' 200 NOT OUT' आणि ' कार्निव्हल मोशन पिक्चर्स'ने हा चित्रपट आपल्या भेटीस आणला जेम्स अर्सकिनने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सचिनच्या बालपणापासून ते तो क्रिकेट लिजंड बनण्यापर्यंतचा सविस्तर प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मात्र यात सचिनची भूमिका नेमकी कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान अवघ्या काही दिवसांपूर्वीच सचिनने या चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच करत १४ एप्रिलला चित्रपटाा टीढर लाँच होणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून सर्व चाहत्यांनाच या टीझरची उत्सुकता लागून राहिली होती आणि आज दुपारी १ वाजता सचिनने टीझरची लिंक शेअर करताचा अवघ्या काही मिनिटांतच त्याला हजारहून अधिक लाईक्स मिळाले.
सध्या बायोपिक्सची भलतीच चलती असून ‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरी कोम’, ‘नीरजा’, ‘साला खडूस’ असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आगामी काळातही ‘अझहर’, ‘एम. एस. धोनी’, ‘रईस’, ‘दंगल’ यासारखे बायोपिक प्रदर्शित होणार असून त्याच पंक्तीत आता सचिनच्या जीवनावर आधारित चित्रपटाचीही भर पडली आहे.
दरम्यान शाहरुख खान, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, सुरेश रैना या सेलिब्रिटीजनीही चित्रपटाबद्दल रिट्विट करत उत्सुकता दर्शवली आहे.
A journey made special by your support and wishes. Presenting the teaser of @SachinTheFilmhttps://t.co/MqJ91UoKUb#SachinTeaser— sachin tendulkar (@sachin_rt) April 14, 2016