नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकपूर्वी भारतीय क्रीडाविश्वात खळबळ माजविणारा ‘डोपिंगचा डंख’ अद्यापही कायम आहे. २०० मीटर स्पर्धेतील धावपटू धरमवीरसिंग याची गेल्या महिन्यात स्पर्धेदरम्यान झालेल्या ‘अ’ चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह असल्याचे संकेत मिळताच मंगळवारी त्याला रिओकडे रवाना होण्यास मज्जाव करण्यात आला.क्रीडा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वाडाच्या नव्या आचारसंहितेत आजीवन बंदीची तरतूद नाही. केवळ आठ वर्षांची बंदी शक्य आहे. धरमवीर बंगळुरू येथील इंडियन ग्रॅण्डप्रिक्समध्ये २०.४५ सेकंद वेळ नोंदवित २०० मीटर दौडीत पात्र ठरला होता. आॅलिम्पिक पात्रता वेळ २०.५० सेकंद अशी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याची कामगिरी खालावली असल्याने बंगळुरू येथे त्याने नोंदविलेल्या वेळेवर अॅथलेटिक्स तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली होती. राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्याऐवजी त्याने रोहतक येथे आपल्या खासगी प्रशिक्षकांकडून धडे घेण्यास प्राधान्य दिले होते. याआधी इंदरजित सिंग आणि नरसिंग यादव हेदेखील डोपिंगमध्ये अपयशी ठरले होते. त्यातल्या त्यात, ‘नाडा’च्या शिस्तपालन समितीने मात्र नरसिंगला कटाचा बळी ठरल्याचे सांगून नुकतीच क्लीन चिट दिली. (वृत्तसंस्था)>‘रिओ’ला जाण्यापासून रोखलेआॅलिम्पिकमध्ये ३६ वर्षांनंतर पात्र ठरलेला भारताचा पहिला धावपटू होण्याचा मान मिळालेला धरमवीर याच्याबाबत शंका निर्माण होताच काल रात्री त्याला रिओकडे जाणाऱ्या विमानाचे तिकीटही नाकारण्यात आले. ११ जुलै रोजी बंगळुरू येथे इंडियन ग्रां-प्रीदरम्यान राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (नाडा) घेतलेल्या चाचणीच्या अ नमुन्यात ‘अॅनाबॉलिक स्टेरॉईड’ आढळल्याचे संकेत मिळाले आहेत. नाडा किंवा भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने मात्र या वृत्तास दुजोरा दिलेला नाही. धरमवीरला काल रिओकडे रवाना व्हायचे होते, पण त्याला येथेच थांबण्यास सांगण्यात आले. नाडाने त्याला ब चाचणी देण्यास इच्छुक आहेस का, अशी विचारणा केली. ही चाचणी सात दिवसांत देणे बंधनकारक आहे. ब नमुना पॉझिटिव्ह आल्यास धरमवीरचे आॅलिम्पिकबाहेर होणे निश्चित राहील. त्याचा हा दुसरा गुन्हा राहील. अशा वेळी त्याच्यावर आठ वर्षांची बंदी येणे क्रमप्राप्त आहे. २०१२ च्या आंतरराज्य अॅथलेटिक्स स्पर्धेत डोप चाचणी देण्यास नकार देताच धरमवीरला १०० मीटर दौडीचे सुवर्ण परत करावे लागले होते.
धावपटू धरमवीर ‘फेल’
By admin | Updated: August 4, 2016 03:50 IST