पर्थ : स्फोटक फलंदाज रॉस टेलर (नाबाद २३५) याच्या विक्रमी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने आॅस्ट्रेलियाच्या ५५९ धावांच्या विशाल धावसंख्येला चोख प्रत्युत्तर देताना दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आपल्या पहिल्या डावात ६ बाद ५१० धावा केल्या. न्यूझीलंड अजूनही ४९ धावांनी मागे असून त्यांचे ४ फलंदाज बाकी आहेत.टेलरने त्याच्या कारकिर्दीत सर्वोत्तम खेळी करताना अनेक विक्रम केले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या. आॅस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक ठोकणारा पहिला फलंदाज बनण्याचा बहुमानही त्याने मिळवला. टेलरने केन विल्यम्सन (१६६) याच्या साथीने २६५ धावांची भागीदारी केली. ही आॅस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंडकडून झालेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. याशिवाय त्याने विल्यम्सनच्या साथीने कारकिर्दीतील भागीदारी २,१८८ पर्यंत पोहोचताना न्यूझीलंडकडून भागीदारीचा नवा ्विक्रमही रचला.कारकिर्दीतील दुसरे द्विशतक ठोकताना टेलरने आॅस्ट्रेलियाचे आक्रमण उद्ध्वस्त केले. टेलरने ३०८ चेंडूंत नाबाद २३५ धावांच्या खेळीत ३४ चौकार मारले. टेलरची याआधी सर्वोत्तम धावसंख्या २१७ होती. त्याने विल्यम्सनला साथीला घेताना तिसऱ्या गड्यासाठी ५९.२ षटकांत २६५ धावांची भागीदारी केली. विल्यम्सनने ३९० मिनिटे खेळपट्टीवर राहताना २५० चेंडूंचा सामना केला आणि १६६ धावांत २४ चौकार ठोकले.टेलरने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ६६ व्या सामन्यात १३ वे शतक ठोकले, तर विल्यम्सनने ४३ सामन्यातील त्याचे १२ वे शतक पूर्ण केले. टेलरने त्याच्या ५० धावा ७४ चेंडूंत आणि १०० धावा १३२ चेंडूंत पूर्ण केल्या. टेलरच्या १५० धावा १९९ चेंडूंत आणि २०० धावा २५४ चेंडूंत पूर्ण झाल्या. टेलरच्या या खेळीने न्यूझीलंडला दिवसअखेर सुखद स्थितीत पोहोचवले. एक वेळ न्यूझीलंडने त्यांचे २ फलंदाज ८७ धावांवर गमावले होते. (वृत्तसंस्था)
रॉस टेलरच्या विक्रमी २३५ धावा
By admin | Updated: November 16, 2015 02:46 IST