मोहाली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघात स्थान न मिळालेल्या रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि स्टुअर्ट बिन्नी यांना तात्पुरती सुट्टी मिळाली आहे. परंतु ही सुट्टी रणजी स्पर्धेसाठी असून, आता हे तिन्ही खेळाडू येत्या शनिवारपासून आपआपल्या संघातून रणजी सामन्यात खेळताना दिसतील. विशेष म्हणजे ७ नोव्हेंबरला सुरू होणाऱ्या मुंबईविरुद्ध उत्तर प्रदेश सामन्यात रोहित आणि भुवनेश्वर एकमेकांविरुद्ध लढतील.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताच्या अंतिम संघात वर्णी न लागल्याने या तिन्ही खेळाडूंना रणजी स्पर्धेत आपआपल्या राज्य संघाकडून खेळण्याची परवानगी मिळाली. बंगळुरू येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी या तिन्ही खेळाडूंचा पुन्हा भारतीय संघात समावेश होईल. त्याच वेळी रणजी स्पर्धेत पंजाबकडून खेळणारे गुरकिरतसिंग मान आणि मनदीप सिंग हे सध्या सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात राखीव खेळाडू आहेत.दरम्यान, रणजी सामन्यात चमकदार कामगिरी करून भारतीय संघातील पुनरागमनाची या तिन्ही खेळाडूंना सुवर्णसंधी असेल. रोहित व भुवनेश्वर यांच्या कामगिरीवर निवड समितीचे विशेष लक्ष असेल. ७ नोव्हेंबरपासून मुंबईत रंगणाऱ्या रणजी सामन्यात रोहित यजमान मुंबईकडून, तर भुवनेश्वर उत्तर प्रदेश संघाकडून खेळणार असल्याने या दोन्ही खेळाडूंमधील टशन लक्षवेधी ठरेल.