न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील द्वितीय आणि पाच वेळचा यूएस चॅम्पियन रॉजर फेडररने आपल्या लौकिकानुसार दणक्यात विजयी सलामी देताना अमेरिकन (यूएस) ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजयी सलामी दिली. २०१२ चा विजेता ब्रिटनच्या अॅण्डी मरेनेदेखील सहज विजय मिळवताना दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी जबरदस्त उन्हामुळे तब्बल १० खेळाडूंनी पहिल्या सामन्यातूनच माघार घेण्याचा निर्णय घेतला.संभाव्य विजेता आणि स्पर्धेतील द्वितीय मानांकित स्वित्झर्लंडच्या फेडररने एकतर्फी झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाच्या लियोनार्डो मायेरचा ६-१, ६-२, ६-२ असा फडशा पाडला. यूएस ओपनमध्ये गेल्या ४५ वर्षांमध्ये विजेतेपद पटकावणारा सर्वात वयस्क खेळाडू बनण्याचे लक्ष्य बाळगलेल्या ३४ वर्षीय फेडररने तब्बाल १२ एस आणि २९ विनर फटके मारले. सायप्रेसच्या मार्कोस बगदातिस याने माघार घेतल्याने दुसऱ्या फेरीत प्रवेश केलेल्या बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिस विरुद्ध फेडररचा पुढील सामना होईल. दुसऱ्या बाजूला तृतीय मानांकित मरेने चुरशीच्या झालेल्या सामन्यात आॅस्टे्रलियाच्या निक किर्गीयोसचे आव्हान ७-५, ६-३, ४-६, ६-१ असे परतवले. त्याचबरोबर तानासी कोकिनाकिस १२ वा मानांकित फ्रान्सच्या रिचर्ड गास्केतविरुद्ध पाचव्या सेटमध्ये रिटायर्ड हर्ट झाला. पाचव्या मानांकित स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंका यानेदेखील सलामीच्या सामन्यात सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवताना स्पेनच्या अल्बर्ट रामोस विनोलेसचे आव्हान ७-५, ६-४, ७-६ असे परतवले. महिलांच्या गटात पहिल्याच दिवशी सनसनाटी निकाल पाहायला मिळाला. झेक प्रजासत्ताकच्या सहाव्या मानांकित युवा लूसी सफारोवाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. युक्रेनच्या बिगरमानांकित लेसिया सुरेंकोने ६-४, ६-१ अशी सहज बाजी मारत सफारोवाचा धुव्वा उडवला. स्पर्धेतील द्वितीय मानांकित रुमानियाच्या सिमोना हालेपने सहजपणे आगेकूच केली. प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या मारिना एराकोविचने दुसऱ्या सेटमध्ये माघार घेतल्याने हालेपला विजयी घोषित केले. या वेळी हालेप ६-२, ३-० अशी आघाडीवर होती. (वृत्तसंस्था)
रॉजर फेडरर, अॅण्डी मरे यांची विजयी सलामी
By admin | Updated: September 2, 2015 23:41 IST