ऑनलाइन लोकमत -
रिओ दी जानेरो, दि. 8 - अमेरिकेचा विश्वविक्रमवीर जलतरणपटू मायकल फेल्प्सने ऑलिम्पिकमधलं 19वं सुवर्णपदक जिंकलं आहे. मायकल फेल्प्सने आपल्या संघासोबत फोर बाय हंड्रेड फ्रीस्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. या सुर्वणपदकासोबत मायकल फेल्प्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सोबतच फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकांची कमाई 23 पर्यंत गेली आहे.
मायकल फेल्प्ससह कॅलेब ड्रेसेल, रायन हेल्ड आणि नॅथन अॅड्रियनचा अमेरिकेच्या संघात समावेश होता. फेल्प्सने ऑलिम्पिकमध्ये एकूण 23 पदकांची कमाई केली आहे. फेल्प्सने त्याच्या पहिल्याच म्हणजे अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकाची कमाई करुन विक्रम रचला होता. त्यानंतर बीजिंग ऑलिम्पिक 8 सुवर्णपदक खिशात टाकले होते. यानंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक आणि आताच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 1 सुवर्णपदकाची कमाई केली आहे.