ब्रासिलिया : रिओत ५ ते २१ आॅगस्ट या कालावधीत होत असलेल्या आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धा दहशतवादी हल्ल्यापासून दूर ठेवण्याचे आव्हान आहे. पण, यात कुठलीही कसर शिल्लक ठेवणार नाही. सर्वांना कडेकोट सुरक्षा पुरविण्यावर भर राहील, असे आयोजन समितीने म्हटले आहे.फ्रान्समध्ये मागील आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ब्राझीलने सुरक्षेचे अतिरिक्त उपाय योजले. रिओत सैनिकांशिवाय ६० हजार पोलीस तैनात राहतील. एकूण ८५ हजार सुरक्षा सैनिक १० हजार ५०० खेळाडूंच्या जीविताची काळजी घेणार आहेत. ही संख्या लंडनमधील सुरक्षाव्यवस्थेच्या दुप्पट आहे. ब्राझीलच्या गुप्तहेर खात्याने दिलेल्या माहितीनुसार रिओतील संभाव्य धोक्याचा तपास करण्यात येत आहे. कुठलाही धोका न पत्करता तपास यंत्रणा डोळ्यांत तेल घालून काम करीत आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती मिचेल टिमर यांनी जगभरातील लोकांना आॅलिम्पिकचा आनंद लुटण्यासाठी ब्राझीलमध्ये येण्याचे आवाहन केले. ब्राझीलमध्ये आॅलिम्पिकदरम्यान इस्लामिक स्टेटची (आयएस) दहशतवादी हल्ले घडविण्याची योजना असल्याचे वृत्त निराधार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आॅलिम्पिकदरम्यान जवळपास पाच लाख लोकांची येथे गर्दी होणार असल्याने मित्रराष्ट्रांना विश्वासात घेण्याचे काम ब्राझीलने सुरू केले आहे. दरम्यान, रिओमध्ये आमच्या खेळाडूंवर दहशतवादी हल्ला होण्याची भीती फ्रान्सने निराधार ठरविली. फ्रान्सच्या गुप्तहेर एजन्सीचे प्रमुख ख्रिस्टोफ गोमार्ट म्हणाले, की आमच्या खेळाडूंवर ब्राझीलमध्ये आयएसकडून घातपात होण्याची भीती खरी नाही. (वृत्तसंस्था)
रिओ आॅलिम्पिक दहशतवादमुक्त ठरवू : ब्राझील
By admin | Updated: July 21, 2016 06:02 IST