अहमदाबाद : स्पर्धेत ‘विजयाची पंचमी’ साजरी करणाऱ्या ‘टॉपर्स’ राजस्थान रॉयल्सला अखेर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने धक्का दिला. राजस्थानने हा सामना ९ गडी राखून जिंकला. राजस्थान पराभूत झाला असला, तरी त्याचे अव्वल स्थान कायम आहे. दुसरीकडे, आरसीबीचा हा ५ सामन्यांत दुसरा विजय आहे. गोलंदाजांचे उत्कृष्ट प्रदर्शन आणि त्यानंतर विराटची ‘कॅप्टन इनिंग’ यांच्या जोरावर बंगळुरूने या एकतर्फी विजयाची नोंद केली. बंगळुरूची जबरदस्त गोलंदाजी आणि तितकेच शिस्तबद्ध क्षेत्ररक्षण यांमुळे राजस्थानला २० षटकांत ९ बाद १३० धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली होती. हे सोपे आव्हान बंगळुरूने १६.१ षटकांत ९ गडी राखून गाठले. त्यांच्या ख्रिस गेलने २०, विराट कोहलीने नाबाद ६२ तर डिव्हिलियर्सने नाबाद ४७ धावा केल्या. सामन्यात पुनरागमन करणारा ख्रिस गेल आणि विराट कोहली मैदानात उतरले. गेलने १७ चेंडूंत २० धावा फटकावल्या. यामध्ये त्याच्या ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. या जोडीने ४.३ षटकांत ३६ धावांची भागीदारी केली. गेल वॉटसनच्या चेंडूवर सॅमसनकरवी झेलबाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या जोडीने शानदार फटकेबाजी केली. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करीत त्यांनी अवघ्या १७व्या षटकांत लक्ष्य गाठून दिले. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी नाबाद ९८ धावांची भागीदारी केली. या जोडीने ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. विराटने ४६ चेंडूंत एक चौकार आणि ३ षटकार ठोकून नाबाद ६२ धावा केल्या. तर, डिव्हिलियर्सने ३४ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या. तत्पूर्वी, रॉयल चॅलेजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विराटचा हा निर्णय गोलंदाजांनी यशस्वी ठरवला. त्यांनी राजस्थानच्या फलंदाजांना सुरुवातीपासून जखडून ठेवले. अजिंक्य राहणे आणि वॉटसन यांनी पहिल्या गड्यासाठी ३६ धावांची भागीदारी केली. पटेलने अजिंक्यचा (१८) त्रिफळा उडवला. त्यानंतर स्मिथ आणि वॉटसनकडून संघाला मोठी आशा होती; मात्र मोक्याच्या क्षणी चाहलच्या ‘फिरकी’वर वॉटसन फसला. फटका मारण्याच्या नादात स्टार्ककरवी तो झेलबाद झाला. वॉटसनने २२ चेंडंूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. त्यानंतर स्मिथने धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडून नायर (१६), हुडा (१), सॅमसन (४) हे झटपट बाद झाले. त्यामुळे राजस्थान संघ १२.४ षटकांत ५ बाद ८९ अशा संकटात सापडला. एक बाजू सांभाळणारा स्मिथही १८व्या षटकांत बाद झाला. त्यामुळे राजस्थानच्या धावगतीला आणखीच ‘ब्रेक’ लागला. तळात स्टुअर्ट बिन्नीने २० चेंडूंत २० धावा केल्याने राजस्थानला १३० एवढी धावसंख्या गाठता आली. फॉल्कनर (४), धवल कुलकर्णी (१) हे अपयशी ठरले. बंगळुरूकडून मिशेल स्टार्कने ३, चहल आणि हर्षद पटेल यांनी प्रत्येकी २ तर अब्दुल्लाने १ गडी बाद केला. त्याआधी बंगळुरूचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला अंतिम अकरांमध्ये संधी देण्यात आली. त्याला रिली रोसोच्या जागी स्थान मिळाले. तसेच, मणविंदर बिस्लाच्या जागी मनदीपसिंगला संधी मिळाली. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने एकमेव बदल केला. राहुल तेवतियाच्या जागी धवल कुलकर्णीला संधी देण्यात आली.
आरसीबीचा ‘टॉपर्स’ला धक्का!
By admin | Updated: April 25, 2015 09:30 IST