नवी दिल्ली : ‘जब तक बल्ला चल रहा है, तब तक थाट है..’ हे युवराजसिंगचे एका जाहिरातीमधील शब्द त्याच्याच बाबतीत खरे ठरताना दिसत आहेत, कारण २0११ च्या विश्वविजयाचा हिरो २0१५ च्या वर्ल्डकपसाठी संघात स्थान मिळवण्यास अपयशी ठरला असतानाच आयपीएलमध्येही त्याची ‘व्हॅल्यू’ घसरली आहे. आयपीएलच्या इतिहासात १४ कोटीची विक्रमी किंमत देवून ज्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने त्याला विकत घेतले त्यांनी आयपीएलच्या आठव्या सत्रासाठी त्याला बंधमुक्त (रिलीज) केले आहे. आयपीएलच्या आठव्या सत्रासाठी खुली करण्यात आलेली ट्रेडिंग विंडो आज बंद करण्यात आली. युवराजसह ज्या मोठ्या खेळाडूंना रिलीज करण्यात आले त्यामध्ये केव्हीन पीटरसन, दिनेश कार्तिक, मुरली विजय (दिल्ली) आणि चेतेश्वर पुजारा (पंजाब) यांचाही समावेश आहे.अनुभवी हरभजन सिंग व वीरेंद्र सेहवाग त्यांचे संघ अनुक्रमे मुंबई इंडियन्स व किंग्ज इलेव्हन पंजाब संघांसोबत कायम आहेत. डेअरडेव्हिल्स आता लिलावामध्ये ४१ कोटी रुपयांच्या रकमेसह उतरणार आहे. आठ फ्रॅन्चायझींपैकी चेन्नई सुपरकिंग्जने सर्वांत कमी चार खेळाडूंना करारमुक्त केले. सुपरकिंग्जने बेन हिल्फेन्हॉस, जॉन हास्टिंग्स, विजय शंकर व डेव्हिड हसी यांना करारमुक्त केले. डेअरडेव्हिल्सनंतर सनरायजर्स हैदराबादने सर्वांत अधिक १० खेळाडूंना करारमुक्त करण्याच्या निर्णय घेतला. आरसीबीला लिलावासाठी २१ कोटी ५० लाख रुपये तर सनरायजर्सला २१ रुपये उपलब्ध राहणार आहेत. सनरायजर्सने गेल्या मोसमात अधिक काळ दुखापतग्रस्त असलेल्या इरफान पठाणला करारमुक्त केले, पण त्यांच्या यादीत डॅरेन सॅमी व अॅरोन फिंच यांच्यासारख्या आश्चर्यचकित करणाऱ्या नावांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
आरसीबीने युवराजला केले ’बंधमुक्त’
By admin | Updated: December 16, 2014 01:19 IST