मुंबई : अजिंक्य रहाणेची ५४ चेंडूंत ९१ धावांची नाबाद खेळी, करुण नायरचा (६१) अर्धशतकीय तडाखा आणि त्यानंतर बिन्नी, वॉटसन आणि धवल कुलकर्णी या त्रिकुटाचे प्रत्येकी दोन बळीयांच्या जोरावर माजी विजेत्या राजस्थानने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १४ धावांनी मात केली. राजस्थानच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने २० षटकांत ७ बाद १७५ धावसंख्येपर्यंत मजल मारली. या विजयानंतर राजस्थानने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. प्रत्युत्तरात, दिल्लीकडून कर्णधार जे. पी. ड्युमिनीने (५६) एकाकी झुंज दिली. इतर फलंदाजांचे योगदान तोकडे पडले. मयंक अग्रवाल (११), अय्यर (९) हे झटपट बाद झाले. युवराजने ड्युमिनीसोेबत संघर्ष केला. मात्र, तो २२ धावा काढून बाद झाला. अॅँजेलो मॅथ्यूज (१६), केदार जाधव (११) यांनाही विशेष योगदान देता आले नाही.सौरभ तिवारीने नाबाद २८ धावा केल्या. त्याआधी, ब्रेबोर्न स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएलमधील ३६व्या या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार जेपी ड्युमिनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ड्युमिनीच्या या निर्णयाला सलामीवीर अजिंक्य रहाणेने आव्हान दिले. वॉटसन आणि रहाणे या सलामीवीरांनी सुरुवातीपासून चौफेर फटकेबाजी केली. अवघ्या ४० चेंडूंत त्यांनी संघाचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर वॉटसन मॅथ्यूजच्या चेंडूवर जाधवकरवी झेलबाद झाला. वॉटसनने २४ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने २१ धावा केल्या. शेन वॉटसन बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि करुण नायर या जोडीने सर्व सूत्रे स्वीकारली. त्यांनी दिल्ली गोलंदाजांची धुलाई केली. त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी केली. रहाणेने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने ३३ चेंडूंत नायरनेही अर्धशतक गाठले. या जोडीने ६३ चेंडूंत शतकी भागीदारी केली. १९ व्या षटकात नायर नाइलच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात मिश्राकरवी झेलबाद झाला. त्याने अवघ्या ३८ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६१ धावा चोपल्या. त्यानंतर जेम्स फॉल्कनर आणि रहाणे या जोडीने राजस्थानला १८९ धावसंख्येपर्यंत आणले. अजिंक्यने ५४ चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ९१, तर फॉल्कनरने नाबाद ८ धावा केल्या. दिल्लीकडून नाइल आणि मॅथ्यूज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. (वृत्तसंस्था)
दिल्लीविरुद्ध राजस्थानचा विजय
By admin | Updated: May 4, 2015 00:52 IST