इंचियोन : कतारच्या महिला बास्केटबॉल संघाला हिजाब घालून खेळण्याची परवानगी नाकारताच इंचियोन आशियाडमधून आज, गुरुवारी चक्क ‘वॉक आऊट’ केले. कतारच्या शिष्टमंडळातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.काल, बुधवारी कतारचा सामना मंगोलियाविरुद्ध होता. सामन्याआधी कतारच्या खेळाडूंना इस्लामिक हिजाब उतरविण्यास सांगण्यात आले; पण या खेळाडूंनी चक्क नकार दिला. यावर आशियाड अधिकाऱ्यांनी मंगोलिया संघाला विजयी घोषित केले. कतारला पुढील सामना नेपाळविरुद्ध खेळायचा होता; पण या सामन्यातही त्यांना हिजाबसह खेळण्याची परवानगी नाकारण्यात आली. कतार संघाने महिला बास्केटबॉलच्या उर्वरित सामन्यातही न खेळण्याचा निर्णय घेतला. इंचियोन आशियाडचे घोषवाक्य ‘विविधतेची चमक’ असे असले, तरी हिजाबच्या मुद्द्यावरून कतार संघाची माघार वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, कतारची खेळाडू अमल मोहम्मद हिचे मत असे की, द. कोरियात पाऊल ठेवण्याआधी आम्हाला हिजाब घालून खेळण्याबद्दल आश्वासन मिळाले होते. आशियाडचे आयोजन त्या-त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या नियमानुसार करण्यात येत असताना आणि अन्य खेळांतील खेळाडूंना हिजाब घालण्याची परवानगी मिळत असताना केवळ बास्केटबॉलवर अन्याय का?इराणची लाईटवेट महिला क्वाडरपल स्कल्स प्रकाराची कांस्यविजेती खेळाडू हिजाब घालून खेळली होती. कुवेतची नाजला ट्रायथलॉनमध्ये आणि इराणची ऐगई सुराया बॅडमिंटनमध्ये हिजाब घालून खेळली. या वादामुळे आशियाई आॅलिम्पिक परिषदेने प्रसिद्धीपत्रक काढून खेळाडूंच्या हितांना प्राधान्य दिले जावे, असे आवाहन केले. खेळाडू काय परिधान करून खेळू इच्छितात हे क्रीडा महासंघांनी आधीच ठरवून टाकावे, असेही या प्रत्रकात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
कतारचे आशियाडमधून ‘वॉक आऊट’
By admin | Updated: September 26, 2014 04:23 IST