ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. 8 - कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने पुण्यावर 6 विकेट्स राखून मात केली. आघाडीचे चार फलंदाज ठराविक अंतराने बाद झाल्यावर मॅक्सवेलने डेव्हिड मिलरच्या साथीने अभेद्य 79 धावांची भागीदारी कर पंजाबला विजय मिळवून दिला.
164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. मनन व्होरा (14), वृद्धिमान साहा (14), हाशिम आमला (28) आणि अक्षर पटेल (24) हे झटपट बाद झाल्याने पंजाबची अवस्था 4 बाद 84 अशी झाली. मात्र ग्लेन मॅक्सवेल (नाबाद 44) आणि डेव्हिड मिलर (नाबाद 30) यांनी पंजाबला सहजपणे विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी बेन स्टोक्स आणि मनोज तिवारी यांच्या फटकेबाजीच्या बळावर पुणे संघाने पंजाबसमोर 164 धावांचे आव्हान ठेवले आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स (50) आणि मनोज तिवारी (40) यांच्या फटकेबाजीच्या बळावर 163 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर मयांक अग्रवाल शुन्यावर बाद झाल्याने पुणे संघ अडचणीत सापडला होता. पण कर्णधार स्मिथ आणि रहाणे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रहाणे 19, तर स्मिथ 26 धावांवर बाद झाले. एका बाजूने स्टोकची फटकेबाजी सुरु होती. तर दुसऱ्या बाजूने विकेट जात होत्या. संघाची सर्व मदार धोनीवर होती मात्र , त्याला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. 11 चेंडूत पाच धावा काढून तो बाद झाला. धोनीनंतर स्टोक्सही लगेच माघारी परताला. स्टोक्स आणि धोनी माघारी परतल्यानंतर मनोज तिवारी आणि डॅनियल ख्रिश्चनच्या अखेरच्या षटकातील फटकेबाजीने पुण्याने 163 धावांपर्यंत मजल मारली. डॅनियल ख्रिश्चनने 8 चेंडूत 17 धावा ठोकल्या.