मुंबई : पुरुष एकेरीत तिसऱ्या मानांकित पंकज पवारने अग्रमानांकित संदीप देवरुखकरचा आणि महिला एकेरीत बिगरमानांकित संगीता चांदोरकरने सहाव्या मानांकित नीलम घोडकेचा पराभव करून वरिष्ठ मुंबई जिल्हा कॅरम अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. वरिष्ठ गटात बिगरमानांकित सुरेश काजरोळकर यांनी तिसऱ्या मानांकित सुधाकर शिर्के यांच्यावर अंतिम विजय मिळवला. तर सांघिक गटात शिवतारा संघाने बाजी मारली. शिवाजी पार्कातील महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट अॅन्ड गाइड पॅव्हेलियनमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या पुरुष एकेरी अंतिम सामन्यात पंकजने आक्रमक खेळ करताना पहिला गेम २५-१० असा जिंकला. संदीपने दमदार पुनरागमन करीत दुसरा गेम १६-२५ असा जिंकून १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये पंकजने २५-१० अशा फरकाने बाजी मारून अजिंक्यपदावर कब्जा केला. महिला गटात बिगरमानांकित संगीताने अनपेक्षित कामगिरी करताना नीलम घोडकेचा २-० असा पाडाव केला. संगीताला पहिल्या गेममध्ये नीलमकडून कडवी झुंज मिळाली. मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना संगीताने पाच गुणांनी २५-२० असा पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये २५-१७ असा विजय मिळवताना संगीताने महिला गटाचे विजेतेपद निश्चित केले. वरिष्ठ गटात बिगरमानांकित सुरेश यांनी सुधाकर शिर्के यांना २५-१४, २५-१० असे नमवले. सांघिक गटात शिवतारा स्पोटर््स संघाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (नायगाव) संघाचा ३-० असा धुव्वा उडवला. (क्रीडा प्रतिनिधी )
पंकज, संगीता यांचे वर्चस्व
By admin | Updated: January 13, 2016 03:51 IST