नवी दिल्ली : भारत-पाकदरम्यान क्रिकेट संबंध पूर्ववत करण्यासाठी उभय देशांतील क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न सुरू असतानाच आता दोन्ही देशांत हॉकी मालिका पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी पुढे आली आहे. पाक हॉकी संघाचे मुख्य कोच शहनाझ शेख यांनी आशियाई हॉकी वाचविण्यासाठी ही मालिका सुरू होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. बेल्जियममधील एंटवर्प येथे २० जूनपासून सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या सेमिफायनलच्या तयारीत व्यस्त असलेले शेख इस्लामाबाद येथून वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, ‘‘भारत-पाक हॉकी मालिका पूर्ववत न झाल्यास आशियाई हॉकी संपून जाईल. आमचे खेळाडू शैलीदार खेळण्याऐवजी क्लिनिकल हॉकीवर भर देतील.’’ भारत आणि पाक संघ विश्व हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत अ गटात आहेत. याच गटात आॅस्ट्रेलिया, फ्रान्स आणि पोलंडचा समावेश आहे. भारत-पाक सामना २६ जून रोजी खेळला जाईल. या सामन्यात पाक संघ भारतावर मात करेल, असा विश्वास शेख यांनी व्यक्त केला. भुवनेश्वर येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात पाकने भारताला ४-३ ने पराभूत केले होते. पाकसाठी ६८ सामन्यांत ४५ गोल नोंदविणारे दोन वेळेचे आॅलिम्पियन शेख पुढे म्हणाले, ‘‘आधुनिक हॉकीतील आघाडीच्या दहा संघांच्या खेळात फारसा फरक नाही. आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेत भारताला धूळ चारली. या वेळीदेखील आमची तयारी भक्कम आहे; पण सामन्याच्या दिवशी होणाऱ्या कामगिरीवर विजयाचे समीकरण विसंबून असते.’’आॅस्ट्रेलियात पाकने चार देशांच्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर दहा दिवसांचा कोरियाचा दौरा केला. ५ जूनपासून संघाचे इस्लामाबाद येथे तयारी शिबिर सुरू झाले. वर्षभरापूर्वी पाक संघाचे कोच बनलेले शेख पुढे म्हणाले, ‘‘अलीकडे आम्ही फार चांगली हॉकी खेळलो. पूर्वी प्रतिस्पर्धी हॉकी खेळणे कठीण झाले होते. सध्या पेनल्टी कॉर्नर ही संघाच्या जमेची बाजू ठरली आहे. आधुनिक हॉकीत पेनल्टी कॉर्नरचे विशेष महत्त्व असून, आमच्या संघात चार पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञ आहेत. आम्ही शूटआऊटवरदेखील कठोर मेहनत घेत असल्यामुळे कनव्हर्शन रेट चांगला आहे.’’ पाकचा संघ ११ जून रोजी निवडला जाईल. १५ जून रोजी हा संघ स्पर्धास्थळी रवाना होणार आहे. (वृत्तसंस्था)
भारत-पाक हॉकी मालिका सुरू करा : पाक कोच
By admin | Updated: June 10, 2015 01:24 IST