प्रिटोरिया : ‘ब्लेड रनर’ नावे जगप्रसिद्ध असलेला द. आफ्रिकेचा धावपटू आॅस्कर पिस्टोरियस हा आपली प्रेयसी रिवा स्टीनकॅम्प हिच्या हत्येप्रकरणी दोषमुक्त झाल्याच्या दुस-याच दिवशी सदोष मनुष्यवधाच्या आरोपात मात्र अडकला आहे. या प्रकरणी त्याला दीर्घ काळासाठी कोठडीची हवा खावी लागेल, अशी शक्यता आहे.हत्येच्या आरोपातून मुक्तता झाल्यानंतर द. आफ्रिकेचे न्या. थोकोजिले मसिपा यांनी आज, शुक्रवारी आदेशात म्हटले की, २०१३ साली ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी टॉयलेटच्या बंद दरवाजावर पिस्टोरियसने चार गोळ्या झाडल्या. त्याचा हेतू कुणाची हत्या करण्याचा नव्हता. त्यातून त्याला निर्दोष सोडण्यात आले; पण गोळी झाडण्यामागे वाईट हेतू दिसतो. एक समजूतदार व्यक्ती दरवाजामागे काय आहे, हे जाणून घेतल्यानंतरच गोळ्या झाडू शकला असता; पण पिस्टोरियसने खात्री करून घेण्यापूर्वीच गोळ्या झाडल्या. हे कृत्य बेजबाबदारपणाचे, तसेच सदोष मनुष्यवधाचे होते.हत्येच्या आरोपासंदर्भात न्या. मसिपा म्हणाले, ‘आरोपी हत्येप्रकरणी दोषी आढळला नाही. त्याला मुक्त करण्यात आले आहे; पण निष्काळजीपणे हत्या केल्याप्रकरणी तो सदोष मनुष्यवधाचा दोषी ठरतो.’न्यायमूर्ती निर्णय देत असताना पिस्टोरियस शांतचित्ताने ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर भाव नव्हते. दुसरीकडे प्रेक्षकगॅलरीत बसलेल्या स्टीनकॅम्पच्या मित्रांना अश्रू आवरेनासे झाले. न्यायाधीश पुढील काही दिवसांत पिस्टोरियसची शिक्षा निश्चित करतील. वाईट हेतूने हत्या केल्याप्रकरणी कायद्यात अनिवार्य शिक्षेची तरतूद नाही; पण शिक्षेचा विचार करतेवेळी न्या. मसिपा विवेकाधिकार वापरतील. पिस्टोरियसला हत्येच्या आरोपातून मुक्तता केल्याबद्दल कायदेतज्ज्ञांनी मात्र आश्चर्य व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)
आॅस्कर पिस्टोरियस अखेर अडकलाच
By admin | Updated: September 13, 2014 00:34 IST