मेलबोर्न : आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या जात असलेल्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीचा टप्पा आटोपला असून, आता १८ मार्चपासून (बुधवार) उपांत्यपूर्व फेरीचा थरार रंगणार आहे. बाद फेरी गाठणारे अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींसाठी सज्ज झाले आहेत. बुधवारी सिडनी क्रिकेट मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि १९९६चा विजेता श्रीलंका या संघांदरम्यान उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना रंगणार आहे. ४२ लढतींच्या साखळी फेरीत अखेरच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणारा श्रीलंका संघ ‘अ’ गटात तिसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगकाराने साखळी फेरीत सलग चार शतके झळकाविण्याचा विक्रम नोंदविला. या स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकाविणाऱ्या फलंदाजांमध्ये संगकारा आघाडीवर आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता दक्षिण आफ्रिका संघाला या स्पर्धेत साखळी फेरीत भारत व पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार ए बी डिव्हिलियर्सने ६ सामन्यांत ४१७ धावा फटकाविल्या आहेत. उपांत्यपूर्व फेरीत गतचॅम्पियन भारतीय संघाला आशियाई प्रतिस्पर्धी बांगलादेशाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उभय संघांदरम्यान १९ मार्चला गुरुवारी एमसीजीवर लढत होईल. जाणकारांच्या मते, उपांत्यपूर्व फेरीत भारताला सर्वांत सोपे आव्हान मिळाले आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा मार्ग खडतर नसला तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खेळाडूंनी आत्ममश्गूल राहू नये, असे धोनीने संघ सहकाऱ्यांना बजावले आहे. बांगलादेश संघाने इंग्लंडला स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यास भाग पाडले आहे.२० मार्चला आॅस्ट्रेलिया व पाकिस्तान संघांदरम्यान उपांत्यपूर्व फेरीची तिसरी लढत रंगणार आहे. ही लढत अॅडिलेडमध्ये खेळली जाणार आहे. त्यानंतर २१ मार्चला न्यूझीलंड व वेस्ट इंडीज संघांदरम्यान वेलिंग्टनमध्ये उपांत्यपूर्व फेरीची चौथी लढत होणार आहे. सिडनी व वेल्ािंग्टन येथे खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीतील विजेत्या संघांदरम्यान आॅकलंड येथे उपांत्य लढत होईल, तर मेलबोर्न व अॅडिलेड येथील उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्या संघांची गाठ उपांत्य फेरीत सिडनी येथे पडणार आहे. (वृत्तसंस्था)
...आता येईल खरा रंग
By admin | Updated: March 16, 2015 02:20 IST