मुंबई : रवीकुमार समर्थ याने शानदार १८० धावांची खेळी करून कर्नाटकला यजमान मुंबईविरुद्ध आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र हरमीत सिंगने समर्थसह कर्नाटकचे ६ फलंदाज १३९ धावांत बाद करताना मुंबईला २१ धावांची नाममात्र आघाडी मिळवून दिली. कर्नाटकला ४१५ धावांत रोखल्यानंतर मुंबईने तिसऱ्या दिवस अखेर दुसऱ्या डावात बिनबाद १९ अशी सुरुवात केली. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर गुण निश्चित करून मुंबईने बादफेरीतील आशा कायम ठेवल्या आहेत. कालच्या २ बाद १७२ धावांवरून सुरुवात करताना कर्नाटकने समर्थच्या जोरावर दमदार खेळ केला. मनीष पांड्येला (५) झेलबाद करून हरमीतने मुंबईला यश मिळवून दिले. मात्र यानंतर समर्थने शिशिर भावने (६२)सोबत चौथ्या विकेटसाठी १३६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करीत मुंबईकरांना दमवले. या वेळी कर्नाटक मुंबईला अडचणीत पकडणार अशी चिन्हे दिसत होती. तसेच हरमीतने कर्नाटकच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद केले. मात्र दुसऱ्या बाजूला समर्थ शड्डू ठोकून उभा असल्याने मुंबईच्या अडचणी संपल्या नव्हत्या. हरमीतने सूर्यकुमार यादवकरवी समर्थला माघारी धाडत मुंबईच्या मार्गातील मुख्य अडसर दूर केला. समर्थने तब्बल ४०० चेंडू खेळताना १६ चौकार व एक उत्तुंग षटकार खेचून १८० धावा फटकावल्या. यानंतर विनय कुमार (१८), उदीत पटेल (८) आणि श्रीनाथ अरविंद (२) यांना झटपट बाद करताना मुंबईने पाहुण्यांना ४१५ धावांत रोखताना नाममात्र का होईना, पण महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. हरमीतव्यतिरिक्त गिरप (२), ठाकूर (१) आणि संधू (१) यांना बळी मिळवण्यात यश आले.यानंतर दुसऱ्या डावाची सुरुवात करताना यजमानांनी आक्रमणाला मुरड घालत ८ षटकांमध्ये २.३७च्या धावगतीने बिनबाद १९ अशी मजल मारली. श्रीदीप मांगेला आणि कर्णधार आदित्य तरे हे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी नाबाद ९ धावा काढून खेळपट्टीवर टिकून आहेत. मुंबईकडे आता ४० धावांची आघाडी आहे. अखेरचा दिवस बाकी असल्याने हा सामना जवळजवळ अनिर्णीत राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून, अखेरच्या दिवशी धोका न पत्करता फलंदाजीचा सराव करण्यावर मुंबईकरांचा भर असेल. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबईकडे नाममात्र आघाडी
By admin | Updated: February 9, 2015 04:56 IST