अॅडीलेड : कसोटी क्रिकेट इतिहासात प्रथमच गुलाबी रंगाने खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात मिशेल स्टार्क, जोश हेझलवुड यांनी प्रत्येकी ३, तर नॅथन लियोन व पीटर सिडल यांनी प्रत्येकी दोन बळी घेत न्यूझिलंडचा पहिला डाव २०२ धावांत संपुष्टात आणला. दिवसा अखेर आॅस्ट्रेलियाच्या २ बाद ५४ धावा झाल्या होत्या. अॅडिलेड ओव्हल मैदानावर शुक्रवारी या ऐतिहासिक सामन्यास सुरूवात झाली. न्यूझिलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने नाणेफेक जिंकून घेतलेला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरविला. न्यूझिलंडचा सलामीवीर मार्टीन गुप्तील (१) याला हेझलवुडने पायचीत करीत पहिला झटका दिला. टॉम लॅथम (५०) याचा अपवाद वगळता एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. त्याने १०३ चेंडूत ७ चौकारांसह अर्धशतकी खेळी केली. केन विल्यम्सन (२२), रॉस टेलर (२१), मिशेल सेंटनर (३१), बीजे. वाटलिंग (२९) मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. कर्णधार मॅक्युलम देखील केवळ ४ धावा काढून तंबुत परतला. स्टार्कने २४ धावांत ३, हेझलवुडने ६६ धावांच्या मोबदल्यात ३ गडी तंबूत धाडत न्यूझिलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.आॅस्ट्रेलियाचा २५ वर्षीय युवा खेळाडू फिलिप ह्युज याच्या मृत्यूला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्याच्या स्मरणार्थ खेळाडू दंडावर काळी फित लावून मैदानावर उतरले होते. आॅस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळलेल्या फिलिपला गेल्या वर्षी सिडनीत झालेल्या एका घरगुती सामन्या दरम्यान उसळता चेंडू डोक्याला लागल्याने मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला होता. यावेळी व्हीडिओ स्क्रीनवर फिलिबच्या संबंधातील एक व्हिडिओ दाखविण्यात आला. तसेच त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी क्रिकेटपटू तीन मिनिटे ड्रेसिंगरुमच्या बाहेर आले होते. आॅस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पीटर सीडलने शुक्रवारी डोव ब्रेसवेल याला जो बर्न्स याच्याकरवी झेल बाद करीत दोनशेवा बळी मिळविला. भारताविरुद्ध २००८साली मोहालीत झालेल्या सामन्यात या ३१वर्षीय खेळाडूने पदार्पण केले होते. हा त्याचा ५८वा कसोटी सामना आहे.
न्यूझिलंडला २०२ धावांत गुंडाळले
By admin | Updated: November 27, 2015 23:52 IST