Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025 : दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन अन् भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने घरच्या मैदानात रंगलेल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत गोल्डन कामगिरी करून दाखवलीये. बंगळुरुमध्ये पार पडलेल्या NC Classic स्पर्धेत ८६.१८ मीटर थ्रोसह नीरज चोप्रानं सुवर्ण पदक पटकावले आहे. केनियाचा ज्युलियस येगो याने ८४.५१ मीटर थ्रोसह रौप्य तर श्रीलंकेच्या रुमेश पथिरेज याने ८४.३४ मीटर थ्रो सह कांस्यवर नाव कोरले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
घरच्या मैदानातील पहिली आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा
NC Classic 2025 म्हणजे नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धा. भारतातील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय दर्जाची भालाफेक स्पर्धा आहे. बंगळुरुच्या कांतेरावा स्टेडियमवर पार पडलेल्या या स्पर्धेत देशविदेशातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
पहिल्या प्रयत्नात मागे पडला होता नीरज चोप्रा, कारण...
नीरज चोप्राची या स्पर्धेतील सुरुवातही फाउल थ्रोसह झाली. पहिल्या फेरीत केनियाचा ज्युलियस येगो याने सर्वोत्तम ७९.९७ अंतर लांब भाला फेकत आघाडी मिळवली होती. याशिवाय भारताच्या रोहित यादवनं पहिल्या प्रयत्नात ७७.११ मीटर अंतर भाला फेकला. याशिवाय साहिल सिलवाल याने पहिल्या प्रयत्नात ७७.४८ मीटर अंतर भाला टाकला.
तिसऱ्या प्रयत्नात साधला 'गोल्डन' कामगिरीचा डाव
पण दुसऱ्या प्रयत्नात नीरज चोप्रानं ८२.९९ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात ८६.१८ मीटर थ्रो टाकला. त्याची ही कामगिरी त्याला सुवर्ण पदक पक्के करण्यासाठी उपयुक्त ठरली. चौथ्या प्रयत्न वाया गेल्यावर नीरज चोप्रानं पाचव्या प्रयत्नात ८४.०७ मीटर अंतर भाला फेकला. या स्पर्धेतील जेतेपदासह भारतातील भालाफेक स्पर्धेतील पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेता ठरणारा तो पहिला भारतीयही ठरला आहे.