मुंबई: किंग्स इलेव्हन संघात युवा खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरली आहे. आमच्या संघाने नवोदितांना कायम प्राधान्य दिले. अक्सर पटेल, डेव्हीड मिलर यांसारख्या युवा खेळाडूंनी दमदार खेळ करताना आपआपल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले ज्याचा आम्हाला अभिमान आहे, असे आयपीएलच्या किंग्स ईलेव्हन पंजाब संघाचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग याने सांगितले.नुकताच मुंबईतील क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे झालेल्या एका कार्यक्रममध्ये किंग्स ईलेव्हन पंजाब संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. यावेळी सेहवाग सोबत संघाची मालकीण प्रीती झिंटा देखील उपस्थिती होती.गतस्पर्धेत आमची कामगिरी खुप चांगली झालेली. अंतिम सामन्यातील अपयशामुळे आमचे विजेतेपद हुकले. यंदा आम्ही ती कसर नक्की भरुन काढू, असा विश्वास देखील सेहवागने व्यक्त केला. विश्वचषक स्पर्धेनंतर लगेच आयपीएलला सुरुवात होणार असल्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू कसे स्थिरावणार या प्रश्नावर सेहवाग म्हणाला की, आम्ही व्यावसायिक खेळाडू असल्याने आम्हाला सवयच असते. विश्वचषकानंतर दोन आठवड्यांचा वेळ मिळणार असून खेळाडू आपल्या कुटुंबियांना भेटून आयपीएलसाठी सज्ज होतील. पुण्यातील सराव शिबीरात आमचा पुर्ण संघ सहभागी होईल.सेहवागने प्रशिक्षक संजय बांगर यांच्याविषयी सांगितले की, बांगर संघातील खेळाडूंसोबत मित्राप्रमाणे वागतात. त्यांच्यामुळे संघात मैत्रीपुर्ण वातावरण राहते. (क्रीडा प्रतिनिधी)
नवोदितांच्या कामगिरीचा अभिमान आहे - सेहवाग
By admin | Updated: March 4, 2015 02:25 IST