ऑनलाइन लोकमत
इंदोर, दि.19 - इंडियन प्रिमियर लीगमध्ये सलग चार विजय मिळवलेला मुंबई इंडियन्सचा संघ भन्नाट फॉर्ममध्ये आहे. आत्मविश्वास बळावलेल्या मुंबईचा आयपीएल-10 मध्ये उद्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना जिंकून विजयी लय कायम ठेवण्याचा तसेच गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा करण्याच्या इराद्याने मुंबईचा संघ उतरणार आहे. पाच पैकी चार विजयाच्या बळावर मुंबईचे आठ गुण आहेत. दुसरीकडे पंजाबने पाचपैकी केवळ दोनच सामने जिकंले आहेत. त्यामुळे मुंबईचे पारडे जड वाटते.
मुंबईची आघाडीची फळी आतापर्यंत अपयशी ठरली असली तरी मधल्या आणि तळाच्या फळीने त्यांची विजयी नौका किनारी लावली होती. कर्णधार रोहित शर्मा फारसा प्रभावी ठरलेला नाही. मागच्या सामन्यात गुजरातविरुद्ध मात्र 29 चेंडूत नाबाद 40 धावा करून त्याने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. तसेच केरन पोलार्डने 23 चेंडूत 39 धावा ठोकल्या. युवा नितीश राणाची कामगिरी सातत्याने उंचावत आहे. संघासाठी सर्वात मोठी उपलब्धी हार्दिक आणि कुणाल पांड्या हे आहेत. दोघांनी अष्टपैलूत्व सिद्ध केलं आहे. हरभजनने देखील पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी बजावली. मलिंगा तसेच मिशेल मॅक्लेनघन यांनीही बळी घेतले आहेत.
दुसरीकडे पंजाबचा मार्ग सोपा दिसत नाही. सलग दोन विजयाने सुरुवात करणारा हा संघ पुढच्या तिन्ही सामन्यात पराभूत झाला. पंजाबकडे कर्णधार ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर आणि इयोन मोर्गन हे धोकादायक फलंदाज आहेत. हशिम अमला कुठल्याही प्रकारात उपयुक्त फलंदाज आहे. पण एकसंध कामगिरी करण्यात हा संघ कमी पडतो. मनन वोहरा याने सनराइजर्स हैदराबादविरुद्ध 50 चेंडूत 90 धावा ठोकल्या तरीही संघ पाच धावांनी पराभूत झाला होता. गोलंदाजीत मोहीत शर्मा, अक्षर पटेल यांच्या यशस्वी माºयावर संघाच्या विजयाच्या आशा अवलंबून असतील.