नागपूर : पुणे शहर संघाचा महेश मोहोळ आणि मुंबई पूर्वचा विक्रांत जाधव यांनी गादी गटात तसेच गतविजेता जळगावचा विजय चौधरी आणि सोलापूर जिल्ह्याचा बाला रफिक शेख यांनी माती गटात येथील चिटणीस पार्कवर सुरू असलेल्या ५९व्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. दोन्ही गटाचे अंतिम सामने आज रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून होतील. माती आणि गादी विभागातील विजेत्या मल्लांमध्ये सायंकाळी जेतेपदासाठी लढत गाजणार आहे. विजेत्या मल्लाला मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ मामासाहेब मोहोळ स्मृती चांदीची गदा तसेच एक लाख रुपयांचा रोख पुरस्कार दिला जाईल.शनिवारी गादी गटाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात महेश मोहोळने राहुल खाणेकरचा ५-३ ने पराभव केला. राहुलने सुरुवातीला दोन गुणांची आघाडी घेतली होती; पण दुसऱ्या फेरीत महेशने आक्रमक मुसंडी मारून विजय मिळविला. मुंबई पूर्वच्या विक्रांत जाधवने सोलापूर शहरच्या समाधान पाटील याच्यावर अवघ्या १० सेकंदात एकतर्फी मात केली.माती गटात पहिल्या चुरशीच्या उपांत्य लढतीत सोलापूर जिल्ह्याचा बाला रफिक शेखने बीडच्या गोकुळ आवारे याचे आव्हान मोडीत काढले. ही लढत दोन्ही डावांत पूर्ण सहा मिनिटे गाजली. त्यात बाला रफिकने १०-४ अशी सरशी साधली; पण गोकुळ आवारेने अखेरच्या क्षणाला ढाक मारली. ती यशस्वी झाली असती तर लढतीचा निकाल वेगळा राहिला असता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या विजय चौधरीने साताऱ्याचा किरण भगतला तांत्रिक आधारे पराभूत केले. दोघांनी प्रत्येकी चार गुण घेतल्याने बरोबरी झाली; पण विजयने ‘भारंदाज’ डाव टाकून मोक्याच्या क्षणी दोन गुण संपादन केले. शेवटी गुण मिळविणारा मल्ल विजयी होत असल्याने विजयने बाजी मारली. यादरम्यान विजयचा पाय हौदाबाहेर गेल्याची ओरड झाली होती. तांत्रिक पंचांनी रिप्ले पाहिला. विजयचा टोंगळ्यापर्यंतचा भाग हौदाबाहेर नसल्याचे दिसताच त्याला विजयी घोषित करण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)उत्कर्ष काळे, रवींद्र करे यांना सुवर्णपुण्याचे उत्कर्ष काळे आणि रवींद्र करे यांनी क्रमश: ६१ आणि ७४ किलोगटांच्या माती विभागात ५९व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत शनिवारी सुवर्णपदक जिंकले.६१ किलोंच्या अंतिम सामन्यात पुणे जिल्हा संघाचा मल्ल उत्कर्ष याने कोल्हापूरच्या कांतिकुमार पाटीलला चितपट करून सुवर्ण जिंकले. या गटाचे कांस्य सोलापूर शहरचा माणिक कारंडे याने जिंकले. त्याने सोलापूर जिल्ह्याचा आकाश आसोले याच्यावर विजय मिळविला.७४ किलोंच्या निर्णायक कुस्तीत सांगलीचा किरण अनुसे याने थकवा आल्याने निर्णायक क्षणी कुस्ती सोडताच रवींद्र करे सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. अनुसेला रौप्य मिळाले. अमरावतीच्या अब्दुल सोहेलला कांस्य मिळाले. सोहेलच्या रूपाने विदर्भाला मिळालेले हे पहिलेच पदक आहे. चांदीची गदा, मोहोळ कुटुंबाची भेट!प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती विजेत्या मल्लाला मामासाहेब मोहोळ स्मृती चांदीची गदा देण्याची परंपरा अखंड सुरू आहे. मामासाहेबांचे सुपूत्र माजी खा. अशोक मोहोळ यांच्यातर्फे एक लाख रुपये किमतीच्या चांदीचा मुलामा असलेली दीड किलो वजनाची आकर्षक गदा १९८३ सालापासून दरवर्षी दिली जाते. पुण्यात ही गदा दरवर्षी तयार केली जाते व स्पर्धा असेल तेथे अशोक मोहोळ सन्मानपूर्वक घेऊन जातात.माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांनी याविषयी माहिती दिली.गेली ३३ वर्षे मी ही परंपरा जपतो आहे असे सांगून ते म्हणाले,‘ केसरी कुस्तीची घोषणा होताच गदा तयार करण्याचे काम सुरू केले जाते. मामासाहेबांनी कुस्ती जोपासली. ती लोकप्रिय केली. त्यांचे काम पुढे रेटण्यासाठी पुण्यात कुस्ती संकुल सुरू करण्यात आले आहे.’मोहोळ यांनी ही गदा नंतर चिटणीस पार्कवर आणली. ती आयोजकांच्या स्वाधीन करण्याआधी प्रेक्षकांमध्ये सभोवताल फिरविण्यात आली.
मोहोळ, जाधव, शेख, चौधरी अंतिम फेरीत
By admin | Updated: January 10, 2016 04:42 IST