लॉस वेगास : फ्लॉईड मेवेदर याने रविवारी येथे बॉक्सिंग खेळाच्या इतिहासाच्या ‘शतकातील महामुकाबल्यात’ मॅनी पॅकियो याला पराभूत करीत जगातील आपणच सर्वोत्तम वेल्टरवेट बॉक्सर आहोत हे सिद्ध केले. बॉक्सिंगच्या विश्वातील महानायक ठरणाऱ्या मेवेदरला २0 कोटी डॉलरचे बक्षीस मिळाले. तथापि, हा मुकाबला अपेक्षेनुरूप चित्तथरारक झाला नाही. मेवेदरने फिलिपाइन्सच्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला सहजपणे नमवले. त्यामुळे काट्याची लढत होईल या अपेक्षेने आलेल्या एमजीएम ग्रँडमध्ये पोहोचलेल्या १७ हजार प्रेक्षकांची घोर निराशा झाली.या दोघांतील महामुकाबला आतापर्यंतचा सर्वाधिक बक्षीस रकमेचा म्हणजे ४0 कोटी डॉलर असल्याने या लढतीकडे सर्व जगताचे लक्ष लागून राहिले होते.या लढतीवर सर्वांत मोठी अशी ४0 कोटी डॉलरची बक्षीस रक्कम होती आणि पैशांच्या तुलनेत बॉक्सिंग इतिहासातील सर्वांत जास्त ही आकर्षक लढत होती.पॅकियोने सुरुवातीला आक्रमक धोरण अवलंबले आणि पहिल्या फेरीत त्याने मेवेदरच्या हनुवटीवर जोरदार ठोशे लगावले; परंतु तो त्याचा हा वेग लढतीच्या १२ व्या फेरीपर्यंत कायम ठेवू शकला नाही. मेवेदरने त्याच्या उंचीचा फायदा उठवला आणि काऊंटर पंच करण्यात यशस्वी ठरला. मेवेदरने शनिवारी झालेल्या या लढतीनंतर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुढील लढतीनंतर निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले. हॉलीवूडचे काही दिग्गजही याप्रसंगी उपस्थित होते. त्यात निर्देशक क्लाइंट ईस्टवूड, अभिनेता रॉबर्ट डि निरो, जॉन वोईट, डेंजेल वॉशिंगटन, ब्रॅडली कूपर, एनबीए स्टार मॅजिक जॉन्सन आदींचा समावेश होता. वर्ल्डचॅम्पियन मेवेदर हा सर्वाधिक कमाई करणारा बॉक्सर आहे. त्याची संपत्ती सुमारे २७ अब्ज इतकी आहे, तर त्याच्यासोबत पराभूत झालेल्या पॅकियो याची संपत्ती सुमारे २२ अब्ज आहे. यापूर्वी २00२ मध्ये माईक टायसन आणि लेनोक्स लुईस यांच्यात तर २0११ मध्ये व्लादिमीर कल्चिको आणि डेव्हिड यांच्यात बॉक्सिंगमधील महामुकाबला झाला होता.(वृत्तसंस्था)
मेवेदरच ठरला चॅम्पियन
By admin | Updated: May 4, 2015 00:58 IST