मुंबई : तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात मयूर चव्हाणने मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना गौरांग खोरासियाचा २-१ असा पराभव करून इंटर बीपीसीए पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ व आयडियल स्पोटर््स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई व उपनगरच्या कॅरमपटूंसाठी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे प्राचार्य डॉ.गोरक्ष पारगावकर व अनुभवी खेळाडू महेंद्र तांबे यांच्या हस्ते पार पडला.वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात झालेल्या अंतिम फेरीत मयूरने अचूक स्ट्रोकचा धडाका लावताना पहिला गेम २५-१० असा जिंकून १-० आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये मात्र, गौरांगने दमदार पुनरागमन केले. अवघ्या एका गुणांच्या फरकाने गौरांगने गेम जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली, तर निर्णायक अंतिम गेममध्ये मयूरने पहिल्या बोर्डापासून पकड मिळवली. या वेळी गौरांगने काही प्रमाणात प्रतिकार केला. मात्र, मयूरच्या आक्रमक खेळापुढे त्याचा निभाव लागला नाही. अंतिम गेममध्ये राखलेल्या वर्चस्वाच्या जोरावर मयूरने २५-१०, २४-२५, २५-९ अशी बाजी मारत जेतेपद निश्चित केले.दरम्यान, उपांत्य फेरीच्या सामन्यात गौरांग खोरासियाने रोहित नाईकला २५-३ तर मयूर चव्हाणने अनिकेत जैतापकरला २५-७ असे नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. (क्रीडा प्रतिनिधी)
मयूर चव्हाणचे वर्चस्व
By admin | Updated: July 24, 2016 00:46 IST