मुंबई : सोलापूरच्या माउली जामदांडेने कोल्हापूरच्या विकास काळेला धूळ चारत मुंबई महापौर चषक कुस्ती स्पर्धेत दमदार आगेकूच केली. दुसरीकडे सांगलीकर सूरज निकमने सोलापूरच्या गणेश फडतरेला लोळवून आपले आव्हान कायम राखले. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई उपनगर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्ला (प.) येथील सर्वेश्वर मंदिर मैदानात सुरू असलेल्या या स्पर्धेत मॅटवर रोमांचक कुस्तीचा थरार मुंबईकरांनी अनुभवला.खुल्या ७४ ते १२० वजनी गटात माउलीने विकास विरुद्ध आक्रमक सुरुवात केली. या वेळी विकासनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर देत लढत चुरशीची केली. या दोघांतील अटीतटीची लढत अनिर्णीत सुटेल असे दिसत असताना माउलीने विकासला मोक्याच्या वेळी भारंदाज चाणाक्ष पद्धतीने लोळवत विजय मिळवला. दुसरीकडे सांगलीच्या सूरज निकमने सोलापूरच्या गणेश फडतरेचा पराभव करून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. त्याचवेळी नावाजलेल्या दादा सरोदेला पराभव स्वीकारावा लागला. बार्शीच्या नवनाथ इंगळेने दादाचा पराभव करत स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधले. (क्रीडा प्रतिनिधी)
सोलापूरच्या माउलीची विजयी कूच
By admin | Updated: June 6, 2016 02:37 IST