ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २४ - आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून चेन्नई टीमचं नेतृत्त्व करणारा महेंद्रसिंग ढोणी आता पुढील वर्षी दुस-या टीममधून खेळेल अशी शक्यता टाइम्स ऑफ इंडियाने वर्तवली आहे. राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्जचा संघ दोन वर्षांसाठी बाद झाल्यामुळे ढोणी दोन वर्षे आयपीएल खेळणार नाही की वेगळा संघ निवडेल असा प्रश्न होता. मात्र, कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असलेला ढोणी दोन वर्षे आयपीएल न खेळण्यापेक्षा वेगळ्या संघातून खेळेल असा कयास आहे.
दोन नव्या संघांचा पुढील आयपीएलमध्ये समावेश होणार असल्याने या नव्या संघात ढोणी दिसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन नवे मालक कोण असतील हे अद्याप अस्पष्ट आहे. अर्थात, दोन्ही नवे संघ ढोणीला व चेन्नईमधल्या काही चमकत्या खेळाडुंना घ्यायला उत्सुक असतील हे स्पष्ट आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार राजस्थान व चेन्नईच्या संघातून सहा खेलाडू नव्या दोन संघांमध्ये सामावले जातील आणि बाकीच्या खेळाडुंचा लिलाव होईल. या सहा खेळाडूंमध्ये एक ढोणी असेल हे जवळपास निश्चित आहे. जर दोन वर्षांनी ढोणी क्रिकेट विश्वात असेल तर तो परत चेन्नईमध्ये जाऊ शकतो, परंतु तोपर्यंत ढोणी आयपीएल क्रिकेटपासून फारकत घेण्याची शक्यता अगदीच कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे असो. ढोणीच्या चेन्नईच्या चाहत्यांसाठी निराशेची बाब असली तरी देशभरातल्या चाहत्यांसाठी मात्र ही आनंदाची गोष्ट ठरणार आहे.