कोलकाता : अखेरच्या मिनिटापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात यजमान बंगाल वॉरीयर्स संघाला बलाढ्य तेलगू टायटन्स विरुध्द अवघ्या २ गुणांनी ३०-३२ असा निसटता पराभव पत्करावा लागला. संपुर्ण सामन्यात यजमानांनी वर्चस्व राखल्यानंतर अखेरच्या १५ मिनीटात जबरदस्त मुसंडी मारताना तेलगू टायटन्सने पुर्ण सामनाच फिरवला. दीपक हूडाने जबरदस्त अष्टपैलू खेळ करतान तेलगूचा विजय साकारला. तर यजमानांकडून कोरीयाच्या जँग कुन ली याने सर्वांची मने जिंकताना आक्रमक चढाया केल्या.नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात सुरुवातीला तेलगू संघाने वर्चस्व राखल्यानंतर यजमान बंगालने जबरदस्त पुनरागमन करताना सामन्यात आघाडी मिळवली. या सामन्यात कर्णधार दिनेश कुमार अपयशी ठरल्यानंतर बंगलावर थोडे दडपण आले होते. मात्र कोरीयन कुन ली याने चमकदार खेळ करताना संघाला आघाडी मिळवून दिली. त्याने एकूण १३ चढायांपैकी तब्बल ७ चढाया यशस्वी केल्या. ४ वेळा बोनस गुणांची कमाई करीत त्याने संघाकडून सर्वाधिक १२ गुण मिळवले. दुसऱ्या बाजूने बाजीराव होडगेने देखील दमदार पकडी करुन कुन ली याला चांगली साथ दिली. मध्यंतराला बंगाल वॉरियर्स संघाने १६-१० अशी मजबूत आघाडी घेत सामन्यावर वर्चस्व राखले होते. यानंतर मात्र तेलगू टायटन्सने झुंजार खेळ करताना सामन्याचे चित्रच पालटले. दीपक हुडाने एक सुपर टॅकल करताना सर्वाधिक १४ गुण मिळवून तेलगू टायटन्सला थरारक विजय मिळवून दिला. त्याने आक्रमणात ११ तर बचावामध्ये ३ गुणांची कमाई करताना शानदार अष्टपैलू खेळ केला. कर्णधार राहूल चौधरीने देखील खोलवर चढाया करताना यजमानांना दुसऱ्या सत्रात जेरीस आणले. अखेरच्या मिनीटामध्ये तेलगू टायटन्स एका गुणाने २९-३० असे पिछाडीवर असताना राहूलने यशस्वी चढाई करुन दोन गुण मिळवत संघाला ३१-३० असे आघाडीवर नेले. यानंतर आक्रमक पवित्रा घेताना सुनील जयपालची निर्णायक पकड करुन विजयावर शिक्कामोर्तब केला.(वृत्तसंस्था)
अंतिम क्षणी तेलगूची बंगालविरुद्ध शानदार बाजी
By admin | Updated: July 23, 2015 23:08 IST