मेलबोर्न : ४०० वन-डे खेळणारा जागतिक क्रिकेटमध्ये चौथा खेळाडू बनलेल्या कुमार संगकाराचे शतक तसेच तिलकरत्ने दिलशानच्या नाबाद १६१ धावांच्या बळावर श्रीलंकेने विश्वचषकात गुरुवारी बांगला देशला ९२ धावांनी धूळ चारली. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या लढतीत अफगाणिस्तानला काठावर नमविणाऱ्या माजी विजेत्या आणि दोन वेळेच्या उपविजेत्या लंकेने प्रथम फलंदाजी करीत एका गड्याच्या मोबदल्यात ३३२ धावा ठोकल्या. बांगला देशला त्यांनी ४७ षटकांत २४० धावांत गुंडाळले. २१ षटकांत १०० धावांत बांगला देशचा अर्धा संघ बाद झाला होता. त्यानंतर शाकिब अल हसन ४६, शब्बीर रहमान ५३ यांनी लंकेच्या विजयाची प्रतीक्षा वाढविली. या सामन्यात लंकेला फलंदाजीत सूर गवसला खरा पण बांगला देशने पाच संधी गमाविल्या. दिलशानने सलामीला लाहिरू थिरिमाने (५२) सोबत १२२ धावांची भागीदारी केली. नंतर दुसऱ्या गड्यासाठी संगकारा-दिलशान यांनी नाबाद २१० धावा वसूल केल्या. संगकाराने २२ व्या वन-डे शतकात १३ चौकार व एक षट्कार मारला. दिलशानने आपल्या १७व्या वन-डे शतकात २२ चौकार मारले. थिरिमानेला अर्धशतकी खेळीत तीनदा जीवदान मिळाले. बांगला देशची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच चेंडूवर मलिंगाने सलामीवीराची दांडी गूल केली. सौम्या सरकार २५ आणि इनामूल हक २९ यांनी दुसऱ्या गड्यासाठी ४० धावांची भागीदारी केल्यानंतर महमदूल्लाहने २८ धावा केल्या. शाकिब-मुशफिकर यांनी मात्र सहाव्या गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी केली; पण लक्ष्य मोठे असल्याने त्यांची खेळी व्यर्थ गेली. लंकेकडून मलिंगाने तीन तसेच लकमल आणि दिलशान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. (वृत्तसंस्था)
लंकेने ‘बांगला’ला धुतले
By admin | Updated: February 27, 2015 01:09 IST