चेन्नई : माझ्या खेळण्याच्या तंत्रात उणीव नसून यॉर्कशायरमध्ये कौंटी क्रिकेटमध्ये खेळून आधुनिक क्रिकेटसाठी मानसिकदृष्ट्या सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया भारत ‘अ’ संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजाराने व्यक्त केली. इंग्लंड व आॅस्ट्रेलियात कसोटी मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर पुजाराला भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आले. जाणकारांच्या मते त्याच्या तंत्रात दोष असल्यामुळे विदेशात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिकेत भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करणाऱ्या पुजाराने लवकरच सूर गवसेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पुजारा पुढे म्हणाला, ‘मी याच शैलीने नेहमी धावा फटकावल्या आहे. माझ्या तंत्रात दोष नसून मी त्यावर ठाम आहे. मी माझ्या खेळावर मेहनत घेणार असून भविष्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे.’या मालिकेत मोठ्या खेळी करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास पुजाराने व्यक्त केला. पुजारा म्हणाला, ‘मी खेळाचा आनंद घेण्यास प्रयत्नशील आहे. मी धावा फटकावून संघाला विजय मिळवून देण्यास इच्छुक आहो. येथे माझ्यावर कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी आहे. मी नेट््समध्ये चांगली फलंदाजी करीत असून धावा फटकावण्यात यश येईल, अशी आशा आहे. राष्ट्रीय संघात असताना आणि नसतानाही क्रिकेटपटू म्हणून कामगिरीत सुधारणा करण्यास प्रयत्नशील असतो. अंतिम संघात स्थान मिळणे माझ्या हातात नसते; पण खेळात सुधारणा करण्यास प्रयत्नशील असतो. मला संधीची प्रतीक्षा करावी लागेल.’ राहुल द्रविडच्या उपस्थितीचा खेळाडूंवर सकारात्मक परिणाम होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास खेळाडू उत्सुक आहेत. द्रविड सर्वांना मार्गदर्शन करीत आहेत. द्रविड कारकिर्दीत कमालीचे यशस्वी ठरले असून, त्यांना खेळाच्या सर्वंच विभागांची सखोल माहिती आहे. सध्या सर्व खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत.’ (वृत्तसंस्था)
तंत्रात उणीव नाही : पुजारा
By admin | Updated: July 21, 2015 23:43 IST