क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी दोन पदक जिंकून देणाऱ्या मनू भाकरसह वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातील चार खेळाडूंना या पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! भारतीय महिला नेमबाज मनू भाकरशिवाय भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यासह बुद्धीबळ क्षेत्रात अविश्वसनीय कामगिरी करुन दाखवणारा विश्व चॅम्पियन गुकेश डी याचाही 'खेलरत्न' पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवन येथे आयोजित कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींकडून खेळाडूंना देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
मनू भाकरचा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरी धमाका मनू भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पदकी निशाणा साधला होता. एवढेच नाही तर सरबजोत सिंगच्या साथीनं १० मीटर मिश्र दुहेरी सांघिक नेमबाजी प्रकारातही तिने कांस्य पदकाची कमाई केली होती. एका ऑलिम्पिक हंगामात दोन पदकं जिंकणारी ती स्वतंत्र भारतातील पहिली महिला खेळाडू ठरलीये.
डी. गुकेश ठरला सर्वात होता बुद्धिबळाच्या पटलावरचा सर्वात युवा विश्वविजेता
डी गुकेश याने बुद्धिबळाच्या पटलावरच्या खेळात इतिहास रचत नवा राजा झाला. चन्नईच्या १८ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याने विश्व फिडे चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेत चीनच्या ३२ वर्षांचा विश्वविजेता डिंग लिरेन याला चेकमेट करत सर्वात युवा विश्वविजेता होण्याचा पराक्रम करून दाखवला होता.
हॉकीपटू हरमनप्रीत सिंगची लक्षवेधी कामगिरी
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघानं हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली कांस्य पदकाची कमाई केली. भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक मिळवून देण्यात हरमनप्रीत सिंगची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० गोल डागले होते. या कामगिरीच्या जोरावर तिसऱ्यांदा त्याने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाकडून (FIH) मिळणाऱ्या सर्वोत्कृष्ट हॉकीपटूचा पुरस्कार पटकवला होता. त्यात आता देशातील सर्वोच्च पुरस्कारावरही त्याने नाव कोरले आहे.
पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या प्रवीण कुमारचाही सर्वोच्च पुरस्कारानं होणार सन्मान
यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवली. उत्तर प्रदेशच्या प्रवीण कुमार याने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील पुरुष गटातील उंचउडी T64 प्रकारात आशियाई विश्व विक्रम प्रस्थापित करत सुवर्ण पदकाची कमाई केली होती. दोन्ही पाय नसताना कृत्रिम पायाच्या आधारे देशासाठी सुवर्ण कामगिरी करणाऱ्या या खेळाडूचा देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.