पोर्ट आॅफ स्पेन : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) दोषी सीईओ जॅक वॉर्नर यांनी अमेरिकेकडून आपल्याला योग्य न्यायाची अपेक्षा नसल्याचे वक्तव्य करीत फिफावर चांगलेच तोंडसुख घेतले. दुसरीकडे फिफाच्या भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अर्जेंटिनाच्या एका क्रीडा कंपनीच्या सीईओने स्वत:ला इटलीच्या पोलिसांच्या स्वाधीन केले.माजी शिक्षक, तसेच त्रिनिदादचे माजी संरक्षणमंत्री राहिलेले वॉर्नर हे विश्व फुटबॉलला हादरे देणाऱ्या भ्रष्टाचार प्रकरणात अडकले आहेत. अमेरिकेने त्यांना प्रत्यार्पण करण्याची त्रिनिदादकडे विनंती केली आहे. यावर वॉर्नर म्हणाले, ‘‘अमेरिकेत निष्पक्ष चौकशी होणार नाही. २०२२ चे यजमानपद मिळविण्यात अपयशी ठरल्यामुळे अमेरिका माझा हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न करीत आहे.’’ एका साप्ताहिकाच्या संपादकीय लेखात वॉर्नर पुढे म्हणतात, ‘‘आपले नुकसान करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्याला अमेरिका न्यायपूर्ण वागणूक देईल, असे मला वाटत नाही. व्हाईट हाऊसमध्ये माझे आणि ब्लाटर यांचे स्वागत खुद्द राष्ट्रपती बराक ओबामा यांनी केले होते, तीच अमेरिका आता दुटप्पी वागत आहे. (वृत्तसंस्था)
जॅक वॉर्नरने घेतले फिफावर ‘तोंडसुख’
By admin | Updated: June 11, 2015 08:47 IST