ब्रिस्बेन : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान काल, शनिवारी संपलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यांत आचारसंहितेचे उल्लंघन करणारा भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मावर सामना शुल्काच्या १५ टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात स्मिथला बाद केल्यानंतर ईशांतने अपशब्द वापरल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला. ईशांतवर लेव्हल १ चा आरोप असून, तो त्याने मान्य केला असून, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही.याव्यतिरिक्त सामनाधिकारी जेफ क्रो यांनी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथवर संथ षटकगतीसाठी दंड ठोठावला. आॅस्ट्रेलिया संघाने निर्धारित वेळेत तीन षटके कमी टाकली. प्रत्येक षटकासाठी संघातील खेळाडूंवर सामना शुल्काच्या १० टक्के, तर कर्णधारवर २० टक्के दंड ठोठावण्यात येतो. त्यामुळे स्मिथवर सामना शुल्काच्या ६० टक्के, तर खेळाडूंवर ३० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. स्मिथ कर्णधार म्हणून आगामी वर्षभरात पुन्हा संथ षटकगतीसाठी दोषी आढळला तर त्याच्यावर एका सामन्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात येईल. (वृत्तसंस्था)
ईशांतला दंड
By admin | Updated: December 22, 2014 04:51 IST