मुंबई : राज्य बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याचा ईशान नक्वी आणि पुण्याचा वरुण खानविलकर जोडीने पुण्याच्या समीर भागवत आणि सुधांशू मेडसीकर जोडीचा २-० असा पराभव केला. या विजयाच्या जोडीवर ईशान -वरुणने महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात अजिंक्यपदावर नाव कोरले.महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने औरंगाबाद येथील क्रीडा संकुलात स्पर्धेचे सामने खेळवण्यात आले. स्पर्धेत २० जिल्ह्यातील ४०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पुरुष दुहेरीत अंतिम सामन्यात ईशान-वरुण जोडीने पहिल्या सेटमध्ये २१-१८ असे वर्चस्व राखत, सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये समीर-सुधांशू जोडीने कडवा प्रतिकार केला. मात्र, ईशान-वरुणच्या व्यूहरचनेपुढे त्यांचा निभाव लागला नाही. अखेर दुसऱ्या सेटमध्ये २४-२२ अशी बाजी मारत स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. दरम्यान, उपांत्य फेरीत ईशान-वरुणने निहार केळकर-विनायक दंडवते जोडीवर २१-१८, २१-१२ अशी मात केली होती.ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत ईशानने बॅडमिंटनचे धडे गिरवले. या पूर्वी २००८, २०१० आणि २०११ मध्ये महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत अजिंक्यपदाची हॅटट्रिक साधली होती, पण २०११ नंतर पाठदुखीच्या त्रासाने त्याला बॅडमिंटन कोर्टाबाहेर राहावे लागले होते. मात्र, तब्बल पाच वर्षांनंतर आजारावर मात करत, ईशानने प्रशिक्षक मयुर घाटणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य स्पर्धेत विजयी पुनरागमन केले.
ईशान नक्वीचे अजिंक्यपद
By admin | Updated: September 11, 2016 03:24 IST