बासेटेरे : आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनचा अपवाद वगळता भारताच्या उर्वरित गोलंदाजांना शनिवारी विंडीज बोर्ड अध्यक्ष एकादशविरुद्ध अनिर्णीत संपलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात छाप सोडता आली नाही. भारतीय गोलंदाज या लढतीत विकेट घेण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले.बोर्ड एकादशने शनिवारी १ बाद २६ धावसंख्येवरून दुसऱ्या डावाला सुरुवात केली. दिवसअखेर बोर्ड एकादशने दुसऱ्या डावात ८६ षटकांत ६ बाद २२३ धावांची मजल मारली होती. भारताने बोर्ड एकादशचा पहिला डाव १८० धावांत गुंडाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ३६४ धावांची मजल मारली होती. आश्विनने ५९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. त्याने प्रभावी मारा करताना तिसऱ्या दिवशी दोन बळी घेतले. अन्य भारतीय गोलंदाज मात्र बळी घेण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. भारताच्या वेगवान गोलंदाजांना बोर्ड अध्यक्ष एकादशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सराव सामन्यातही छाप सोडता आली नव्हती. आता सर्वांचे लक्ष भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान २१ जुलैपासून अॅन्टिग्वामध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यावर केंद्रित झाले आहे. शार्दूल ठाकूर व रवींद्र जडेजा यांनी शनिवारी गोलंदाजीची सुरुवात केली. ठाकूरने अचूक मारा करीत फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. विंडीजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी सराव सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि स्टार फिरकीपटू रविचंद्रन आश्विन यांना गवसलेला सूर भारतीय संघासाठी दिलासा देणारी बाब ठरली. विराटने अर्धशतकी खेळी केली तर आश्विनने दोन्ही डावांत एकूण ६ बळी घेतले. आश्विनने पहिल्या डावात रवींद्र जडेजा व अमित मिश्रा या फिरकीपटूंच्या साथीने विंडीज एकादशचा डाव १८० धावांत गुंडाळला. आश्विन व जडेजाने प्रत्येकी तीन तर मिश्राने दोन बळी घेतले. (वृत्तसंस्था)विंडीज संघाच्या व्यवस्थापकपदी गॉर्नरकिंग्स्टन : माजी वेगवान गोलंदाज आणि ‘बिग बर्ड’ नावाने ओळखले जाणारे जोएल गॉर्नर यांची वेस्ट इंडिज संघाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली. भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत गॉर्नर विंडीज संघासोबत असतील.गॉर्नर यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहील. त्यांनी यापूर्वी २००९-१० मध्ये संघाला सेवा प्रदान केली होती. त्या वेळी टी-२० विश्वकप स्पर्धेदरम्यान त्यांनी प्रभारी व्यवस्थापकपद सांभाळले होते. त्यांनी यापूर्वी विंडीज क्रिकेट बोर्डाचे संचालकपद, बार्बाडोस क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद आणि विंडीज क्रिकेट संघाचे व्यवस्थापकपद सांभाळलेले आहे.६३ वर्षीय गॉर्नर यांनी विंडीज क्रिकेटच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. विंडीज क्रिकेटला सहकार्य करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब असून, संघाच्या व्यवस्थापकपदी निवड झाल्यामुळे आनंद झाला, अशी प्रतिक्रिया गॉर्नर यांनी व्यक्त केली.
भारत-विंडीज लढत अनिर्णीत
By admin | Updated: July 18, 2016 06:13 IST