जोहार बाहरू, मलेशिया : भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सुलतान जोहरू ज्युनियर हॉकी चषकात ५- १ ने पराभूत केले. त्यासोबतच स्पर्धेत भारताच्या विजयी अभियानाला सुरुवात झाली. भारतीय संघाने या पूर्ण सामन्यावर नियंत्रण कायम ठेवले. पहिल्या सामन्यातच सहज विजय नोंदवला. सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाने जोरदार आक्रमण केले. अजय यादव याने पाचव्या मिनिटालाच पहिला गोल केला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला; मात्र पाकिस्तानच्या गोलरक्षकाने अप्रतिम बचाव केला. त्यानंतर पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला; मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्यांना यश आले नाही. भारताकडून २३ व्या मिनिटाला सुमित कुमारने दुसरा गोल केला. दीपसान टिर्की याने उजव्या बाजूकडून चेंडू पुढे नेला आणि गोल केला. त्यानंतर चार मिनिटांनीच अरमान कुरेशी याने भारताकडून तिसरा गोल केला. त्यानंतर ३४ व्या मिनिटात परविंदर सिंग याने शानदार मैदानी गोल केला. मध्यांतरापर्यंत भारताने ४-० अशी आघाडी घेतली. पाकिस्तानकडून एकमेव गोल मोहम्मद दिलबर याने केला; मात्र हरमनप्रीत सिंह याने लगेचच भारताकडून पाचवा गोल केला. भारताचा पुढचा सामना ग्रेट ब्रिटनशी होणार आहे.
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
By admin | Updated: October 11, 2015 23:54 IST