मोहाली : रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन आश्विन यांच्या फिरकी जाळ्यात अलगद अडकत गेलेल्या द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी तिसऱ्याच दिवशी नांगी टाकताच भारताने मोहालीतील पहिली कसोटी तिसऱ्याच दिवशी शनिवारी १०८ धावांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.विजयासाठी २१८ धावांचा पाठलाग करणारा आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात ३९.५ षटकांत १०९ धावांतच गारद झाला. सामनावीर ठरलेल्या जडेजाने ११.५ षटकांत २१ धावांत ५ गडी बाद केले. जडेजा आणि आश्विन यांनी या सामन्यात प्रत्येकी ८ गडी बाद केले. कर्णधार म्हणून विराटचा मायदेशात हा पहिलाच कसोटी विजय ठरला. भारताने पहिल्या डावांत २०१ धावा केल्यानंतर द. आफ्रिकेला १८४ धावांत रोखून १७ धावांची आघाडी मिळविली होती. दुसऱ्या डावात २०० धावा उभारणाऱ्या भारताने आफ्रिकेपुढे विजयासाठी फक्त २१८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताचा दुसरा डाव उपाहारानंतर २०० धावांत आटोपल्यानंतर भारतीय फिरकी गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांच्या तोंडचे पाणी पळविले. जडेजा-आश्विन यांनी पाहुण्यांची भक्कम फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळविली. चार रणजी सामन्यांत ३८ गडी बाद करणारा जडेजा अधिक आक्रमक दिसला. डावाची सुरुवात करणाऱ्या व्हर्नोन फिलॅन्डरला दुसऱ्याच षटकात पायचित केले. दुसऱ्या टोकावरून आश्विनने फाफ डु प्लेसिस (१) याला स्लिपमध्ये बाद केले. कर्णधार हाशीम आमला याला जडेजाचा चेंडू न समजल्याने तो त्रिफळाबाद होताच आफ्रिकेची स्थिती ३ बाद १० अशी होती. अमित मिश्राने डीव्हीलियर्सला (१६) आणि एल्गरला (१६) अॅरॉनने बाद केले. त्यानंतर जडेजाने यष्टिरक्षक डेन विलासला (७) बाद करीत आणखी एक दणका दिला. सायमन हार्मर (११) आणि वान झिल (३६) यांनी सातव्या गड्यासाठी ४२ धावांची भागीदारी केली. पण अखेरचे चार गडी सात धावांत बाद झाल्याने आफ्रिकेच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. हार्मर आणि इम्रान ताहिर यांना जडेजाने टिपले, तर आश्विनने डेल स्टेनचा बळी घेतला. त्याआधी भारताने सकाळी कालच्या २ बाद १२५ वरून खेळताना १६१ पर्यंत मजल गाठली खरी, पण त्यानंतर घसरगुंडी उडाली. चेतेश्वर पुजारा (७७) आणि कोहलीने तिसऱ्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर फिरकीपटूंनी भारताची दाणादाण उडविली. एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेल्याने उपाहारानंतर काही वेळेतच संपूर्ण संघ बाद झाला. तिसऱ्या दिवशी एकूण १८ गडी बाद झाले. (वृत्तसंस्था)धावफलकभारत पहिला डाव : २०१, आफ्रिका पहिला डाव : १८४, भारत दुसरा डाव : मुरली विजय झे. बावुमा गो. ताहिर ४७, शिखर धवन झे. डीव्हीलियर्स गो. फिलॅन्डर ००, चेतेश्वर पुजारा झे. आमला गो. ताहिर ७७, विराट कोहली झे. विलास गो. वान झिल २९, अजिंक्य रहाणे झे. बावुमा गो. हार्मर २, वृद्धिमान साहा झे. विलास गो. ताहिर २०, रवींद्र जडेजा पायचित गो. वान झिल ८, अमित मिश्रा झे. डू प्लेसिस गो. हार्मर २, आर. आश्विन झे. आमला गो. ताहिर ३, उमेश यादव त्रि. गो. हार्मर १, वरुण अॅरॉन नाबाद १. अवांतर १०, एकूण : ७५.३ षटकांत सर्व बाद २००. गडी बाद क्रम : १/९, २/९५, ३/१६१, ४/१६४, ५/१६४, ६/१७८, ७/१८२, ८/१८५, ९/१८८, १०/२००. गोलंदाजी : फिलॅन्डर १२-३-२३-१, हार्मर २४-५-६१-४, एल्गर ७-१-३४-०, ताहिर १६.३-१-४८-४, रबाडा १२-७-१९-०, वान झिल ४-१-५-१.द. आफ्रिका दुसरा डाव : डीन एल्गर झे. कोहली गो. अॅरॉन १६, व्हर्नोन फिलॅन्डर पायचित गो. जडेजा १, फाफ डू प्लेसिस झे. रहाणे गो. आश्विन १, हाशीम आमला त्रि. गो. जडेजा ००, एबी डीव्हीलियर्स त्रि. गो. मिश्रा १६, वान झिल झे. रहाणे गो. आश्विन ३६, डेन विलास त्रि. गो. जडेजा ७, सायमन हार्मर झे. रहाणे गो. जडेजा ११, डेल स्टेन झे. विजय गो. आश्विन २, कागिसो रबाडा नाबाद १, इम्रान ताहिर पायचित गो. जडेजा. अवांतर १४, एकूण : ३९.५ षटकांत सर्व बाद १०९. गडी बाद क्रम : १/८, २/९, ३/१०, ४/३२, ५/४५, ६/६०, ७/१०२, ८/१०२, ९/१०५, १०/१०९. गोलंदाजी : आश्विन १४-५-३९-३, जडेजा ११.५-४-२१-५, मिश्रा ८-०-२६-१, अॅरॉन ३-०-३-१, यादव ३-०-७-०.हा गोलंदाजांचा सामना होता. विकेटमध्ये कुठलाही दोष नव्हता. फलंदाजांचे या विकेटवर काहीच चालले नाही. अशा खेळपट्टीवर खेळताना मानसिक कणखरता लागते. विजय आणि पुजारा यांनी जी कणखर वृत्ती दाखविली त्यामुळेच आम्ही विजय मिळवू शकलो. रवींद्र जडेजा आणि आश्विन यांनी कमाल केल्यामुळे नंबर वन संघाला नमविणे शक्य झाले.- विराट कोहली, कर्णधार, भारत.विजयाचे श्रेय भारतीय गोलंदाजांना : आमलामोहाली कसोटी जिंकण्याचे श्रेय भारतीय गोलंदाजांना जाते. या खराब खेळपट्टीवर २०० धावांचा पाठलाग शक्य होता. पण १५०-१६० धावा असत्या, तर फरक पडला असता. चार-पाच गडी बाद झाले तरी सामना आमच्या आवाक्यात होता. पण तळाच्या फलंदाजांवर दडपण आल्याने ते स्थिरावू शकले नाहीत. आम्ही संघर्ष केला, पण आमच्या संघाला बाद करण्याचे श्रेय भारतीय गोलंदाजांना जाते. - हाशीम आमला, कर्णधार द. आफ्रिका.नंबर गेम६ पूर्ण सामन्यात वेगवान गोलंदाजांना ६ बळी मिळवता आले. इतर सर्व बळी फिरकीपटूंच्या नावावर आहेत. ३ या सामन्यात केवळ तीन फलंदाजांना ५० हून अधिक धावा काढता आल्या. त्यामुळेच दोन्ही संघांना मोठी धावसंख्या गाठता आली नाही. भारताच्या चेतेश्वर पुजाराची ७७ धावांची खेळी सर्वाधिक राहिली. २ भारताने दोन्ही डावांत धावांचे द्विशतक गाठले. कमी धावसंख्या असूनही भारताने सामना जिंकला. अशीच कामगिरी त्यांनी २००६ मध्ये किंगस्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती.१५आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी सामन्यात १५ बळी मिळविले. याआधी, त्यांना एकदाच १५ पेक्षा जास्त बळी मिळविता आले होते. १९५२-५३ मध्ये आॅस्ट्रेलियाची फिरकी घेत त्यांनी १६ गडी बाद केले होते.१०८एवढ्या धावफरकाने भारताने तीन दिवसांत जिंकलेला हा चौथा सामना ठरला. याआधी, तीन वेळा असा विजय मिळवलेला आहे. १८तिसऱ्या दिवशी एकूण १८ फलंदाज बाद झाले. यामध्ये १६ विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतले आहेत आणि दोन विकेट वेगवान गोलंदाजांनी घेतले.
भारताचा ‘दिवाळी’ धमाका
By admin | Updated: November 8, 2015 03:12 IST