इंचियोन : भारतीय पुरुष संघाला आशियाई स्पर्धेतील फुटबॉल सामन्यात जॉर्डनकडून ०-२ ने पराभव स्वीकारावा लागला़ या पराभवामुळे भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे़ तीन संघ असलेल्या ‘जी’ गटातील भारताचा हा दुसरा पराभव ठरला़ यापूर्वी भारतीय संघाला संयुक्त अरब अमिरात (युएई) विरुद्धच्या लढतीत ०-५ ने मात खावी लागली होती़ या गटातील अव्वल दोन संघ स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचणार असल्याने भारताचे पुढच्या फेरीत पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे़ मुन्हाक स्टेडियमवर झालेल्या या लढतीत भारतीय संघ सामन्याच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करू शकला नाही़ जॉर्डनकडून पहिल्या हाफमध्ये १७ व्या मिनिटाला अलबस्तावी लैत सुबेही याने गोल नोंदवून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली़ दुसऱ्या हाफमध्ये जॉर्डनच्या थाल्जी यजान मोहंमद युसूफ याने ६७ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला २-०ने आघाडी मिळवून दिली़ हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना सामन्यात विजय मिळविला़ भारतीय गोलकिपर अमरिंदर सिंह गोल वाचविण्यात अपयशी ठरला, तर सामन्यात दबावात दिसलेल्या भारताच्या नारायण दास, रॉबीन सिंह आणि कर्णधार सुनील छेत्री यांना यलो कार्ड दाखविण्यात आले़ भारतीय टीमने या लढतीत १८ फाउल केले, तर जॉर्डनने उत्कृष्ट खेळ करताना केवळ चार फाउल केले़ या व्यतिरिक्त जॉर्डनने ६४ टक्केचेंडू आपल्या ताब्यात ठेवला, तर भारतीय संघाला केवळ ३४ टक्के चेंडूच आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आले़
भारतीय संघ आउट
By admin | Updated: September 23, 2014 06:01 IST