बंगळुरू : भारतीय संघाने उज्बेकिस्तानवर वर्चस्व राखताना आशिया ओशियाना ग्रुप एक डेव्हिस चषक लढतीत ४-१ विजयासह विश्व ग्रुप प्लेआॅफमधील आपले स्थान पक्केकेले.भारताने शनिवारीच दुहेरी लढत जिंकून ३-० आघाडीसह सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या विश्व ग्रुप प्लेआॅफसाठी स्थान पक्के केले होते. रविवारी भारतीय संघाचे उज्बेकिस्तानचा सफाया करण्याकडे लक्ष होते; परंतु दुसऱ्या परतीच्या एकेरीच्या लढतीत पराभवामुळे असे होऊ शकले नाही.रामकुमार रामनाथन याने पहिल्या परतीच्या एकेरी लढतीत अवघ्या ६७ मिनिटांत संजार फाजियेव्ह याचा ६-१, ६-२ असा पराभव करून केएसएलटीए स्टेडियममध्ये भारताचा दबदबा कायम ठेवला; परंतु डावखुरा खेळाडू प्रजनेश गुणेश्वरनविरुद्ध जागतिक क्रमवारीतील ४०६ व्या स्थानावरील खेळाडू तैमूर इस्माइलोव्हने परिस्थितीचा अचूक फायदा घेताना दुसरा परतीचा एकेरीचा सामना ७-५, ६-३ असा जिंकताना भारताविरुद्ध आपल्या संघाला सफाया होण्यापासून वाचवले.याआधी भारताने डेव्हिस चषक लढतीत फेब्रुवारी २०१४ मध्ये इंदौरमध्ये चिनी ताइपेचा सफाया केला होता.आज दोन्ही खेळाडूंनी शानदार सर्व्हिस केली; परंतु पदार्पण करणारा प्रजनेश महत्त्वाच्या क्षणी दबावात आला आणि त्याचा निकालावर मोठा परिणाम झाला. आजच्या निकालामुळे नवा कर्णधार महेश भूपतीसाठी ही सुरुवात चांगली ठरली आहे.फाजियेव्हला कोर्टवरील उसळी आणि गतीशी ताळमेळ ठेवण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला आणि याचाच फायदा रामकुमारने उचलला. त्याने तेजतर्रार सर्व्हिस करताना प्रतिस्पर्ध्यास चुका करणे भाग पाडले. रामकुमारने आपली सर्व्हिस वाचवताना ३-० अशी आघाडी घेतली होती. उज्बेकिस्तानचा खेळाडूने चौथ्या गेममध्ये सलग तीनदा दुहेरी चुका केल्या; परंतु त्यानंतरही आपली सर्व्हिस वाचवण्यात तो यशस्वी ठरला. सहाव्या गेममध्ये रामकुमारला आणखी एक ब्रेक पॉइंट मिळाला; परंतु फाजियेव्हने तोदेखील वाचवला. तथापि, त्याने नवव्या गेममध्ये आपली सर्व्हिस वाचवताना पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये पहिल्या गेममधील दोन ब्रेक पॉइंट गमावल्यानंतर रामकुमारने एक ब्रेक पॉइंट मिळवला आणि पुन्हा फाजियेव्हने व्हॉलीवर चूक करताना आपली सर्व्हिस गमावली. फाजियेव्हने काही गेममध्ये चांगली सर्व्हिस केली आणि रिटर्नदेखील चांगले केले; परंतु त्यानंतरही रामकुमारने सातव्या गेममध्ये पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस भेदताना ५-२ अशी आघाडी घेतली आणि पुढील गेममध्ये आपली सर्व्हिस वाचवताना सेट आणि सामनाही जिंकला. (वृत्तसंस्था)
भारत ४-१ ने विजयी
By admin | Updated: April 10, 2017 01:26 IST