ऑनलाइन लोकमत
जमैका, दि. २ - वेस्ट इंडिज विरुद्ध जमैकामध्ये सुरु असलेल्या दुस-या कसोटी सामन्यात भारताची स्थिती बळकट झाली आहे. लोकेश राहुलपाठोपाठ सोमवारी कसोटीच्या तिस-या दिवशी अजिंक्य रहाणेने दमदार शतक झळकवले. रहाणेच्या शतकाच्या बळावर भारताला तीनशेपेक्षा जास्त धावांची आघाडी घेता आली. रहाणेने नाबाद १०८ धावा केल्या.
कर्णधार विराट कोहलीने संघाच्या ९ बाद ५०० धावा असताना डाव घोषित केला. भारताकडे आता एकूण ३०४ धावांची आघाडी आहे. भारताने डाव घोषित करुन वेस्ट इंडिजला फलंदाजीची संधी दिली. पण त्यानंतर पाऊस सुरु झाल्यामुळे खेळ होऊ शकला नाही. पावसामुळे ४० षटकांचा खेळ वाया गेला. मंगळवारी अर्धा तास आधी सामना सुरु होऊ शकतो. दिवसभरात ९८ षटकांचे लक्ष्य आहे.
कसोटीचे दोन दिवस शिल्लक असून चौथ्या दिवशीही हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारताने वेस्ट इंडिजला दिलेले लक्ष्य तसे कठिण आहे. कारण वेस्ट इंडिजची या मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या २४३ आहे. रहाणेचे हे सातवे शतक आहे.
वुद्धीमान सहाने ४७ धावा करुन रहाणेला चांगली साथ दिली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजकडून रॉसटॉन चेसने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने १२१ धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक पाच गडी बाद केले.