ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद, दि. ९ - तिस-या एकदिवसीय सामन्यात महेला जयवर्धनेच्या दमदार शतकाने श्रीलंकेला तारले असून श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी २४३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. उमेश यादवच्या अचूक मा-याने चार फलंदाजांना बाद करत श्रीलंकेला रोखले.
हैद्राबादमध्ये भारत विरुद्ध श्रीलंके दरम्यान तिसरा एकदिवसीय सामना सुरु असून या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली. परेरा आणि संगकारा हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतल्याने श्रीलंकेची अवस्था २ बाद सात धावा अशी झाली होती. त्यानंतर दिलशान आणि महेला जयवर्धने या फलंदाजांनी शतकी भागीदारी करत श्रीलंकेच्या डाव तारला. दिलशानला ५३ धावांवर बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. त्यानंतर शतकवीर महेला जयवर्धनेने एकाकी झुंज देत श्रीलंकेचा डाव पुढे नेला. त्याला सीकुगे प्रसन्नाने २९ धावांची मोलाची साथ दिली. महेला जयवर्धनने ११८ धावांवर असताना आर. अश्विनच्या फिरकीने त्याची विकेट घेतली. अखेरीस श्रीलंकेचा डाव २४२ धावांवरच आटोपला. भारतातर्फे उमेश यादवने चार, अक्षर पटेलने तीन तर धवल कुलकर्णी, आर. अश्विन आणि अंबाटी रायडू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत २-० ने आघाडीवर आहे. तिस-या सामन्यात विजय मिळवून मालिकाही खिशात घालण्याच्या इराद्याने भारतीय फलंदाज मैदानात उतरतील.