रायपूर : आकाशदीपने शेवटच्या क्वार्टरमध्ये कलेल्या गोलच्या बळावर भारताने जर्मनीविरुद्धच्या सामन्यात १-१ असा बरोबरीचा गोल करीत दुसरा पराभव टाळला. अन्य सामन्यांत आॅस्ट्रेलियाने बेल्जियमचा १-०, तर ब्रिटनने कॅनडाचा ३-१ने पराभव करीत विजयी सलामी दिली. हॉकी विश्वलीग फायनल स्पर्धेत भारताला शुक्रवारी अर्जेंटिनाकडून भारतावर ३-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. निकलास वेलेन याने सामन्याच्या पाचव्या मिनिटास गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोनही संघांनी आक्रमण प्रतिआक्रमण केले मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आले. भारताच्या श्रीजेश याने जर्मनीचे आक्रमण परतावून लावल्याने त्यांना आघाडीत भर घालता आली नाही. दुसरीकडे भारताच्या रुपिंदर पाल, आकाशदीप व रमन यांनी काही सुरेख चाली रचत जर्मनीवर चांगला दबाव निर्माण केला. मात्र ते गोल करण्यात अपयशी ठरले. अगदी चौथ्या क्वार्टरपर्यंत जर्मनीची आघाडी टिकून होती. त्यामुळे भारताला या सामन्यातही हार पत्कारावी लागणार अशी चिन्हे होती. त्यातच चौथ्या क्वार्टरच्या पहिल्या मिनिटाला आकाशदीपने लगावलेला फटका जर्मनीच्या गोलरक्षकाने अडविला. त्यानंतर या क्वार्टरच्या तिसऱ्या मिनिटाला मनप्रीतच्या पासवर आकाशदीपने गोल करीत संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. एशेल जॅक्सन व बॅरी मिडलटन यांसारख्या अनुभवी खेळाडूंशिवाय मैदानात उतरत ब्रिटनने कॅनडावर ३-१ अशी मात केली. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटास सायमन मेंटेल याने गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच कॅनडाच्या मार्क पीयर्सन याने मैदानी गोल करीत संघाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. ब्रिटनने दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन मिनिटांत दोन गोल करीत निर्णायक आघाडी घेतली. मेंटेल याने २३ व्या मिनिटाला, तर पाठापाठ निक कॅटेलिन याने गोल करीत आघाडी वाढवित संघाचा विजय निश्चित केला. आता ब्रिटनची लढत बेल्जियमशी, तर आॅस्ट्रेलिया कॅनडाशी दोन हात करेल. - आॅस्ट्रेलियाच्या जेमी ड्वेयर याने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला नोंदविलेल्या एकमेव गोलच्या बळावर बेल्जियमचा १-० असा पराभव केला. बेल्जियमने त्यानंतर प्रतिआक्रमण केले. मात्र ते आॅस्ट्रेलियाचा बचाव भेदण्यात अपयशी ठरले.
भारताची जर्मनीशी बरोबरी
By admin | Updated: November 29, 2015 00:58 IST