ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - मैदानात गोलंदाजांना चोपणा-या रोहित शर्माला त्याची मॅनेजर रितिका सजदेहने क्लीन बोल्ड केले आहे. रितिकासोबत साखरपुडा केल्याची घोषणा रोहित शर्माने ट्विटरवर केली आहे.
टीम इंडियाचा शिलेदार आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सोबतचा सामना झाल्यावर बोरिवलीतील स्पोर्ट्स क्लब येथे गेला. याच क्लबच्या मैदानावर रोहितने वयाच्या ११ व्या वर्षी क्रिकेटचा पहिला सामना खेळला होता. रितिकाला प्रोपोज करण्यासाठीही त्याने हीच जागा निवडली. एखाद्या चित्रपटात शोभेल अशाच पद्धतीने रोहितने रितिकाला
लग्नाची मागणी घातली. रोहितने तिच्यासमोर अंगठी ठेवत तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही होकार देताच रोहितने तिला अंगठी घातली. रविवारी रोहितने रितिकासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करत साखरपुडा झाल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. युवराज सिंग, दिनेश कार्तिक या दोघांनीही रोहित व रितिकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहितची विकेट घेणारी रितिका आहे तरी कोण ?
रितिका सजदेह व रोहित शर्मा एकमेकांना गेल्या सहा वर्षांपासून ओळखत आहेत. रितिका ही स्पोर्ट्स मॅनेजर असून रोहितच्या सर्व सामन्यांमध्ये ती नेहमीच उपस्थित असते. सुरुवातील चांगले मित्र असलेले रोहित व रितिका आता हे नाते आणखी पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघे लग्न कधी करणार हे अद्याप समजू शकलेले नाही.