न्यूयॉर्क : रॉजर फेडररने विजयी आगेकूच कायम ठेवीत अमेरिकन ओपन टेनिसमध्ये गुरुवारी सहज विजयाची नोंद केली. दुसरा दिग्गज लेटन हेविट दुसऱ्या फेरीत संघर्षमय लढतीत पराभूत होताच अनपेक्षितरीत्या स्पर्धेबाहेर पडला. अॅण्डी मरे याला दोन सेट गमविल्यानंतर विजयासाठी बराच घाम गाळावा लागला. महिलांची दीर्घ वेळ चाललेली लढतही विक्रमी ठरली. पुरुष गटात माघार घेणाऱ्यांच्या संख्येत भर पडल्यामुळे कालचा दिवस नाट्यमय घडामोडींनी गाजला.जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या १७ वेळेचा ग्रॅण्डस्लॅम विजेत्या फेडररने स्टीव्ह डार्मिस याचा ६-१, ६-२, ६-१ ने ८० मिनिटांत पराभव केला.तिसरा मानांकित मरेने पहिल्या दोन सेटमध्ये माघारल्यानंतर मुसंडी मारीत फ्रान्सचा अॅड्रियन मॅनरिनो याच्यावर ५-७, ४-६, ६-१, ६-३, ६-१ ने विजयाची नोंद केली. माजी नंबर वन आणि २०१२ चा चॅम्पियन असलेल्या हेविटला मात्र बाहेर पडावे लागले. तो दोन सेटमध्ये माघारला होता. पण मुसंडी मारून बरोबरीत आला. आॅस्ट्रेलियाचा बर्नार्ड टॉमीच याने त्याला ३ तास २७ मिनिटांत ६-३, ६-२, ३-६, ५-७, ७-५ ने पराभूत केले. न्यूयॉर्कमध्ये हा त्याचा अखेरचा सामना होता. ३४ वर्षांचा हेविट जानेवारीत आॅस्ट्रेलियन ओपननंतर निवृत्त होणार आहे. दरम्यान अमेरिकेचे जॅक सोक आणि डेमिन इस्तोमिन यांनी ३३ डिग्री सेल्सियस इतकी गर्मी असल्याचे कारण देत माघार घेतली. पहिल्या चार दिवसांत १२ पुरुष आणि दोन महिला खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. दुसरी मानांकित सिमोना हालेप पाचवी मानांकित पेट्रा क्वीटोव्हा या देखील दुसऱ्या फेरीचा अडथळा दूर करण्यात यशस्वी ठरल्या. हालेपने युक्रेनची कॅटरिना बोंडोरेंको हिच्यावर ६-३, ६-४ ने सरशी साधली तर दोन वेळेची विम्बल्डन चॅम्पियन क्वीटोव्हाने अमेरिकेची निकोल गिब्स हिचा ६-३, ६-४ ने सहज पराभव करीत पुढील फेरी गाठली. (वृत्तसंस्था)विक्रमी सामनामहिलांमध्ये ब्रिटेनची ९७ व्या स्थानावरील खेळाडू जोहाना कोंटा हिने विम्बल्डन उपविजेती गार्बाईन मुगुरुजा हिचा ७-६, ६-७, ६-५ अशा फरकाने पराभव केला. हा सामना विक्रमी ३ तास २३ मिनिटे गाजला. अमेरिकन ओपनच्या इतिहासात महिला एकेरीत सर्वाधिक काळ खेळण्याचा विक्रमही याच सामन्यात नोंदला गेला. याआधी २०११ साली सामंता स्टोसूर व नादिया पेट्रोव्हा यांच्यातील सामना ३ तास १६ मिनिटे चालला होता.
हेविटने मरेला झुंजवले
By admin | Updated: September 4, 2015 23:03 IST